दुर्गाडी खाडीपुलाचे काम रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:46 AM2019-08-01T00:46:16+5:302019-08-01T00:46:21+5:30

पुराचा फटका : संगणक, कागदपत्रे, साधनसामग्री पाण्यात भिजल्याने कंत्राटदाराचे झाले मोठे नुकसान

Durgadi will keep the work of the Bay Bridge | दुर्गाडी खाडीपुलाचे काम रखडणार

दुर्गाडी खाडीपुलाचे काम रखडणार

Next

कल्याण : वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडीपुलावर सहापदरी पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, गेल्या आठवड्यात आलेल्या पुराचा फटका या बांधकामाला बसला असून कंत्राटदार कंपनीचे अतोनात नुकसान झाले आहे. पुलाच्या कामासाठी आणलेली साधनसामग्री पुराच्या पाण्यात गेली. त्यामुळे या पुलाच्या कामात व्यत्यय येऊ न, हे काम रखडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुर्गाडी खाडीवर अस्तित्वात असलेला हा पूल अरुंद असल्याने त्यावरून वाहनांची रहदारी अत्यंत संथगतीने सुरू असते. परिमाणी, वाहतूककोंडीचा सामना वाहनचालक आणि प्रवाशांना सहन करावा लागतो. या पुलाच्या निर्मितीसाठी एमएमआरडीएमार्फत निविदा काढून ते सुप्रीम कंपनीला देण्यात आले होते. जवळपास ७३ कोटी रुपये खर्चाचे हे काम असून या कंत्राट कंपनीला कामाचा कार्यादेश दिला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जुलै २०१६ मध्ये कामाचा शुभारंभ केला गेला. १८ महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. कंत्राटदाराकडून होत असलेला विलंब आणि वाहतूककोंडीचा प्रश्न पाहता याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर विनीता राणे यांनी याप्रकरणी एमएमआरडीए आयुक्तांकडे बैठक घेऊन हा विषय तातडीने सोडवण्याची आग्रही मागणी केली होती. त्यामुळे एमएमआरडीएने सुप्रीम कंपनीकडून पुलाचे काम काढून घेतले.
आॅक्टोबर २०१८ मध्ये हे कंत्राट रद्द करून एमएमआरडीएने नवा कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली. नव्याने टीएनटी कंपनीला पुलाचे काम दिले. कंपनीला मार्च २०१९ मध्ये नव्याने कार्यादेश दिला गेला. टीएनटी कंपनीने रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पुलाचे काम केले होते. हा पूल १६५ दिवसांत कंपनीने बांधला होता. दुर्गाडी खाडीपुलाचे काम जलद होण्यासाठीच या कंपनीला प्राधान्य दिले गेले. मार्चपासून अवघ्या साडेतीन महिन्यांत कंपनीने वेगाने काम केले. मात्र, या संपूर्ण कामावर पुराचे पाणी फिरले आहे.
पुराच्या पाण्याचा फटका कंत्राटदार कंपनीला बसला असून साधनसामग्री वाहून गेली आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या कंटेनर केबिनमध्ये पाणी घुसले. त्यात असलेल्या संगणकांत बिघाड झाला आहे. कामाची महत्त्वाची कागदपत्रे पाण्यात भिजून ती नष्ट झालेली आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा काम कसे उभे करायचे, असा प्रश्न कंत्राटदार कंपनीपुढे उभा ठाकला आहे.
कंत्राटदार कंपनीला झालेले नुकसान कंत्राटदाराने सोसायचे की, त्याची भरपाई सरकार देणार, असा प्रश्न आहे. कंत्राटदार कंपनीतर्फे कंपनीचे झालेल्या नुकसानभरपाईचा पंचनामा करण्यासाठी कल्याण तहसीलदारांकडे कंपनीच्या प्रतिनिधींनी पत्र दिले होते. मात्र, त्यांच्या भरपाईच्या पंचनाम्याविषयी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळालेला नाही.
पूल लवकर झाला तर वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल. कल्याणच्या सगळ्या एण्ट्री पॉइंटवर पुलांची कामे सुरू आहेत. तसेच एण्ट्री पॉइंटवरील पुलांवर वाहतूककोंडीची समस्या आहे. याकडे सरकारी यंत्रणांनी गांभीर्याने पाहण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

कंत्राटदार भरपाईच्या प्रतीक्षेत
कंत्राटदार कंपनीला झालेले नुकसान कंत्राटदाराने सोसायचे की त्याची भरपाई सरकार देणार, असा प्रश्न आहे. कंत्राटदार कंपनीतर्फे कंपनीच्या झालेल्या नुकसानभरपाईचा पंचनामा करण्यासाठी कल्याण तहसीलदारांकडे कंपनीच्या प्रतिनिधींनी पत्र दिले होते. मात्र, त्यांच्या नुकसानभरपाईच्या पंचनाम्याविषयी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. तहसीलदार व पोलीस एकमेकांवर ही बाब ढकलत असल्याचे कंपनीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. पुलाचे काम १८ महिन्यांत पूर्ण करायचे होते. कंपनी चांगली मिळूनही पावसाच्या फटक्यामुळे पुलाचे काम रखडणार आहे. आधीच्या नाकर्त्या कंत्राटदारामुळे झालेला विलंब आणि आताचे नैसर्गिक कारण यामुळे पुलाचे काम लवकर होईल, असे दिसून येत नाही.

Web Title: Durgadi will keep the work of the Bay Bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.