नोटाबंदीच्या काळात पालिकेत भ्रष्टाचार
By admin | Published: January 14, 2017 06:23 AM2017-01-14T06:23:31+5:302017-01-14T06:23:31+5:30
नोटाबंदीनंतर मीरा-भार्इंदर पालिकेने करवसुलीसाठी जमा केलेल्या शंभर, पन्नासच्या नोटा सत्ताधाऱ्यांतील एका नेत्याचे काळे धन
भार्इंदर : नोटाबंदीनंतर मीरा-भार्इंदर पालिकेने करवसुलीसाठी जमा केलेल्या शंभर, पन्नासच्या नोटा सत्ताधाऱ्यांतील एका नेत्याचे काळे धन पांढरे करण्यासाठी वापरल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेने रद्द झालेल्या नोटा कराच्या माध्यमातून वसूल केल्या. त्याचा उपयोग विकासकामांसाठी होणे अपेक्षित असताना करातून जमा झालेल्या शंभर, पन्नासच्या नोटा एका स्थानिक नेत्याचे काळे धन पांढरे करण्यासाठी वापरण्यात आल्या. त्याबदल्यात त्या नेत्याकडील जुन्या नोटा जमा करून घेण्यात आल्या.
प्रभाग अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. ज्यांचे बांधकाम अधिकृत आहे, त्यांची खोटी कागदपत्रे तयार करून ती बांधकामे पाडली जात आहेत. फेरीवाल्यांकडून आर्थिक तडजोड करून त्यांना रस्त्यावर बसण्याची परवानगी दिली जात आहे. हा भ्रष्टाचार नोटाबंदीच्या काळात घडला आहे, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.
मीरा-भार्इंदर (शहर) जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने त्याचे निवेदन उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांना देण्यात आले. उपायुक्तांनी मात्र करवसुलीतील कोणत्याही नोटा बाहेर गेल्या नसल्याचे स्पष्ट करून बेकायदा कामांप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रभारी निरीक्षक यशवंत हापे, माजी उपमहापौर नूरजहाँ हुसेन, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, गटनेते जुबेर इनामदार, प्रभाग सभापती प्रमोद सामंत यांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)