कोरोना काळात महापालिकेच्या ९८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतले हॉटेल्समध्ये उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:50 AM2021-09-16T04:50:52+5:302021-09-16T04:50:52+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या तब्बल ९८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत लक्षणे नसल्याने हॉटेल्समध्ये उपचार घेतले ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या तब्बल ९८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत लक्षणे नसल्याने हॉटेल्समध्ये उपचार घेतले होते. त्याचा खर्च तब्बल १२ लाख १५ हजार रुपये झाला होता. हा खर्च आता पालिकेने देण्यासंदर्भातील प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.
कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये आली होती. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. यामध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांसह सर्वच विभागातील कर्मचारीदेखील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज होते. त्यातच कोरोनाशी लढा देताना पालिकेच्या तब्बल ९८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी लक्षणे नसलेल्या या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या हॉटेल्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पहिल्या लाटेमध्ये कोविडची फारशी रुग्णालये अस्तित्वात नसल्याने या सर्वांची व्यवस्था हॉटेल्समध्ये करण्यात आली होती. यासाठी शहरातील पाच हॉटेल्स सज्ज ठेवण्यात आली होती. या हॉटेल्समध्ये या ९८ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर उपचार करण्यात आले. यासाठी १२ लाख १५ हजार रुपयांचा खर्च आला आहे. त्या खर्चाचा प्रस्ताव पालिकेने तयार केला असून तो महासभेच्या मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.