कोरोनाकाळात जिल्हा प्रशासनाने रोखले नऊ बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:26 AM2021-07-01T04:26:54+5:302021-07-01T04:26:54+5:30
ठाणे : मागील दीड वर्षापासून कोरोना या आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. अशातच केंद्र व राज्य शासनाने टाळेबंदी लागू ...
ठाणे : मागील दीड वर्षापासून कोरोना या आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. अशातच केंद्र व राज्य शासनाने टाळेबंदी लागू केली. यामुळे अनेकांचे रोजगार हिरावले, व्यवसाय बुडाले. यातच मुलींच्या पोषणाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी बालविवाहाचे घाट घातले जात असल्याची गंभीर बाब समोर आली. आदिवासी दुर्गम भागासह सुसंस्कृत नागरी भागातदेखील हे लोण पसरले असून, जिल्हा बाल संरक्षण कक्षाने असे नऊ बालविवाह रोखलेे आहेत.
टाळेबंदीमुळे या काळात सर्वच व्यवहार ठप्प झाले, अनेकांचे रोजगार बुडाले, हातावरचे पोट असलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल झाले. पोटाची खळगी भरण्यासाठी सुरुवातीला जमा असलेली सर्व पुंजी संपली. अशातच दुसरीकडे, मुलींच्या पालन-पोषणाच्या जबाबदारीतून लवकर मुक्त होण्यासाठी बालविवाहाचा घाट घातला जात असल्याच्या अनेक घटना जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आल्या आहेत. यामध्ये मार्च २०२० ते २०२१ यादरम्यान या पथकाने जिल्ह्यातील सात बालविवाह उधळले आहेत. इतकेच नव्हेतर, दोन जणांवर गुन्हेही दाखल केले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा भागात एक बालविवाह रोखला आहे. तर सांस्कृतिक नगरी असलेल्या डोंबिवलीत दोन आणि उल्हासनगरमध्ये तीन बालविवाह राेखले आहेत. एका १७ वर्षीय विद्यार्थिनीला बोहल्यावर चढविण्याचा घाट मुरबाड तालुक्यातील ब्राह्मणवाडीत घातला जात होता. तशी या वाडीत ही पहिलीच घटना नव्हती. पण, १५ मार्चला होणारे हे लग्न जिल्हा बाल संरक्षण कशाच्या सतर्कतेमुळे उधळले गेले.
चालू महिन्यात शहापूर तालुक्यातील आसनगाव या ठिकाणीदेखील दोन बालविवाह लावून देण्याचा घाट घातला जात असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास आणि बाल संरक्षण कक्षाला मिळाली. यानुसार धडक कारवाई करून हे दोन्ही बालविवाह रोखण्यात त्यांना यश मिळाले.
असे असले तरी, जिल्ह्यात बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेमुळे तसेच बालविवाहांबाबत करण्यात येत असलेल्या जनजागृतीमुळे अनेक प्रकरणे समोर येत असल्याने बालविवाहासारख्या अनिष्ठ रूढी व परंपरेला रोखण्यास मदत होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
...........
ग्रामीण भागातील बालविवाह रोखण्यासाठी बाल संरक्षण समिती कार्यरत असून या समितीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधनदेखील करण्यात येत आहे. कमी वयात मुलींचे लग्न लावून दिल्यास, त्यांची शारीरिक वाढ पूर्ण झालेली नसताना त्या गर्भवती राहणे असे प्रकार घडतात. यातूनच कुपोषणाचे प्रमाणदेखील वाढत आहे. यामुळे या अनिष्ठ रूढी आणि परंपरेच्या जोखडातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी समाजामध्ये बालविवाहाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.
- महेंद्र गायकवाड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, ठाणे.