कोरोना काळात वसई महापालिकेला करदिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:05 AM2020-09-23T00:05:31+5:302020-09-23T00:07:45+5:30
मालमत्ता कराची वसुली : तिजोरीत दररोज ५० लाखांची पडतेय भर
लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : २०१९-२०२० या आर्थिक वर्षाच्या काळात सुमारे ३०० कोटींच्या कर वसुलीचे उद्दिष्ट समोर ठेवलेल्या वसई-विरार शहर महानगरपालिकेला कोरोना काळामुळे चांगलाच फटका बसला. ३०० कोटी कर वसुलीचे उद्दिष्ट केवळ कोरोनासारख्या जागतिक आपत्तीमुळे पूर्ण झाले नाही. मात्र तरीही महापालिकेला महसूल प्राप्तीच्या बाबतीत काहीसा दिलासा मिळाला आहे. मालमत्ता करातून महापालिकेच्या तिजोरीत दैनंदिन ५० लाखांची भर पडत आहे. दरम्यान, महापालिकेकडून ६० टक्के बिलांचे वाटप करण्यात आले असून ४० टक्के बिलांचे वाटप लवकरच होणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
वसई-विरार महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोरोनाकाळात शाळा-महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. असे असताना वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून नागरिकांना देण्यात आलेल्या घरपट्टीवर शिक्षण कराचा समावेश करण्यात आला होता. तर यंदा कोणत्याही प्रकारची वृक्ष लागवड महापालिकेकडून केली गेली नसताना याच घरपट्टीत वृक्ष कराचाही समावेश करण्यात आला होता. याबाबत नागरिकांनी शिक्षण कर आणि वृक्ष करासंदर्भात महापालिकेला वस्तुस्थिती समोर ठेवून जाब विचारत हे दोन्ही कर रद्द करून सुधारित घरपट्ट्या देण्याचे आवाहन केले होते. मात्र पालिकेकडून कराच्या वसुलीसंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
शिक्षण करातून वृक्षांची निगा आणि संवर्धन
महापालिकेकडून घरपट्टीवर नमूद केलेला शिक्षण कर हा राज्य शासनाला सुपूर्द करण्याबरोबरच महापालिकेतील वृक्षांची निगा आणि संवर्धन करण्यासाठी वसूल करण्यात येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. राज्य शासनाने शिक्षण कर न घेण्याचे आदेश दिल्यास महानगरपालिका शिक्षण कर घेणार नाही, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, यंदा वसई-विरार शहर महानगरपालिकेला कोरोना काळात मालमत्ता कराच्या वसुलीने चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. दररोज ५० लाखांचा कर पालिकेच्या तिजोरीत जात असल्याने एक प्रकारे महापालिकेला करदिलासा मिळाला आहे.