कोरोनाकाळात लहान मुले झाली ‘मोटू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:43+5:302021-07-04T04:26:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क स्नेहा पावसकर ठाणे : गेल्या वर्षभराहून अधिक काळ कोरोनामुळे शाळा तर बंदच आहेत. पण सुरक्षेच्या कारणास्तव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
स्नेहा पावसकर
ठाणे : गेल्या वर्षभराहून अधिक काळ कोरोनामुळे शाळा तर बंदच आहेत. पण सुरक्षेच्या कारणास्तव बहुतांश पालक मुलांना घराबाहेर नेत नाहीत. खेळ नाही, चालणं नाही की कुठे बाहेर फिरणं नाही. या सगळ्याचा परिणाम लहान मुलांच्या वजनावर झालेला दिसतो. सर्रास मुले ही मोटू अर्थात आपल्या वयाच्या तुलनेत जाड झालेली दिसतात.
लॉकडाऊनमुळे घरात बसून अनेकांच्या वजन वाढल्याच्या तक्रारी ऐकायला मिळताहेत. यातून लहान मुलेही सुटलेली नाहीत. पूर्वी शाळा, क्लासेस, विविध ॲक्टिव्हिटी कोर्स यामुळे मुलांचे घराबाहेर चालणे, फिरणे होत असे. मात्र, गेल्यावर्षी आलेल्या कोरोनाने सगळ्यांची लाईफस्टाईलच बदलली. शाळा, क्लासेस घरातच बसून ऑनलाईन होतात. तेही कमी वेळ असल्याने मुलांवर अभ्यासाचा ताण नाही. तर कोरोनाच्या धास्तीने बरेच पालक मुलांना घराबाहेर खेळायलाही पाठवित नाहीत. घरात बसून हवे तर मोबाईल बघ, टीव्ही बघ, पण बाहेर जायचं नाही, अशीच पालकांची ताकीद मुलांना असते, त्यामुळे मुले पण दिवसभर मोबाईल आणि टीव्हीच्या समोर बसलेली दिसतात. त्यामुळे मुले आळशीही झालीत आणि केवळ बसून आणि बसून जाड पण झालीत.
--------
---------------
का वाढले वजन ?
मुले केवळ घरात बसून आहेत. चालणे, फिरणे, मैदानी खेळ खेळणे होत नाही.
दिवसभर घरात बसलेल्या मुलांसाठी आपण पालक त्यांना हवे त्या खाण्यापिण्याच्या वस्तू आणून देतो.
प्रिझर्व्हेटिव्ह पदार्थ, बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, फास्टफूडचा दैनंदिन खाण्यातील वापर आपला वाढला आहे.
गरजेपेक्षा काही मुले जास्त वेळ झोपतात.
------------
वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजी -
मुलांना घराबाहेर तर पाठविता येत नाही. पण सकाळच्यावेळी आपल्या सोसायटीच्या आवारात गर्दी कमी असेल अशा ठिकाणी, जवळच्याच गार्डनमध्ये आपल्यासोबत मुलांना ५ ते १० मिनिटासाठी नेता येईल. यामुळे मुलांचा कंटाळा दूर होईल.
मुलांना सकाळी लवकर उठवून रात्री लवकर झोपण्याची सवय लावावी.
दिवसभर मोबाईल हातात देण्यापेक्षा मुलांशी इतर बैठे पण बुद्धिला चालना देणारे खेळ खेळा.
घरातल्या घरात मुलांना उड्या मारायला लावा, चालायला लावावे.
बिल्डिंगमध्ये राहत असाल तर मुलांना दररोज किमान २५ पायऱ्या चढउतार करायला लावावे.
---------------
पालकांच्या प्रतिक्रिया
मुलं घरात बसून कंटाळली आहेत. पण बाहेर अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे मुले घरात चिडचिड करण्यापेक्षा मोबाइलमध्ये रमतात. ते त्यांच्या शारिरिक स्थैर्यासाठी योग्य नसले तरी मुलांना विरंगुळा म्हणून फोन द्यावा लागतो.
- कीर्ती रावदंडे, पालक
----------------
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत तर मुलांना जास्त धोका वर्तविला आहे. त्यामुळे यंदाही शाळा लवकर सुरू होण्याची चिन्हे नाहीत. पण घरात बसून परिणामी मुलांचे वजन वाढते आहे. तर मोबाईल बघण्याचा हट्ट मुलांचा असतो. म्हणजे या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मुले घरात बसून हट्टी, मोबाईलवेडी आणि लठ्ठ पण होऊ लागली आहेत.
- प्रथमेश गाेरोले, पालक
---------
--------------
सतत घरात बसून, शरीराला कोणताही व्यायाम नसल्याने अनेक मुलांचे वजन वाढते आहे. मात्र, मुलांना घरात नियमित थोडावेळ तरी योगासने करायला लावावीत. शिक्षणासाठी सोडून मोबाईल, टीव्ही या माध्यमांचा वापर दिवसभरात जास्तीत जास्त एक तास असावा. त्याचबरोबर मुलांचा आहार समतोल असावा. जंकफूड, स्निग्ध पदार्थ, तळलेल्या पदार्थांचे अतिसेवन टाळावे.
- डॉ. गीता खरे,