मतमोजणीदरम्यान कल्याण-भिवंडीत वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:52 PM2019-05-22T23:52:21+5:302019-05-22T23:52:25+5:30
डोंबिवलीत वाहतुकीत केला बदल । पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे प्रशासनाने केले आवाहन
ठाणे/डोंबिवली/भिवंडी : ठाणे, कल्याण आणि भिवंडी मतदारसंघांच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान ठाणे सोडले, तर कल्याण आणि भिवंडीत मतमोजणी
केंद्रांच्या ठिकाणी वाहतूककोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक विभागाने खबरदारी घेऊन त्यात्या ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली असून याच पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहनचालकांना केले आहे.
ठाणे मतदारसंघाची मतमोजणी ही न्यू होरीझॉन स्कूल, घोडबंदर रोड, कावेसर येथे होणार आहे. ही शाळा घोडबंदर रोड या मुख्य रस्त्यापासून आतमधील बाजूला आहे. त्यामुळे या तेथे कोंडी होणार नसल्याने वाहतूकबदल केलेला नाही. दुसरीकडे कल्याण मतदारसंघाची मतमोजणी डोंबिवली पूर्वेतील क्रीडासंकुलातील सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात होणार आहे. मतमोजणीवेळी क्रीडासंकुलाबाहेरील कल्याण रोड आणि घरडा सर्कलकडे जाणारे दोन्ही बाजूकडील रस्ते बंद राहणार आहेत. मात्र, सावित्रीबाई फुले कलामंदिरासमोरील रस्ता वाहतुकीस खुला असेल. त्यामुळे डोंबिवली स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना फुले कलामंदिराला वळसा घालून पेंढरकर महाविद्यालयाकडून जाता येईल. अन्यथा, ठाकुर्लीतील हनुमान मंदिराच्या बाजूकडील रस्त्यानेही जाता येईल. मात्र, हा रस्ता अरुंद असल्याने येथे वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
भिवंडी-कल्याण जॅम?
भिवंडी मतदारसंघाची मतमोजणी प्रेसिडेन्सी स्कूल, एलकुंदे भिवंडी येथे होणार आहे. या ठिकाणी जरी वाहतुकीत बदल केला नसला, तरी येथे कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतून जाणाºया मुंबई-नाशिक मार्गावरील राजनोलीनाका येथे भिवंडी-कल्याण आणि भिवंडी-ठाणे मार्गावर वाहतूककोंडीचे चित्र राहील, असा अंदाज आहे.
वाहनचालकांनी या मार्गांवरून जाताना, योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.