खर्डी ते आगासन दरम्यान धाडसत्र: गावठी दारुसह साडे सहा लाखांचा माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 07:16 PM2018-01-18T19:16:21+5:302018-01-18T19:19:37+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे डी विभागाने खर्डी ते आगासन दरम्यानच्या खाडी किनारी असलेल्या सहा वेगवेगळया दारु निर्मिती अड्डयांवर धाडसत्र राबवून रसायनासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ठाणे : मुंंब्रा आणि डायघर भागातील गावठी दारुच्या सहा अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डी विभागाने गुरुवारी दिवसभर धाडसत्र राबविले. या धाडीत दारु निर्मितीसाठी लागणा-या रसायनासह सहा लाख ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे, ठाण्याचे अधीक्षक एन. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी विभागाचे निरीक्षक महेश बोज्जावार, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, पी. पी. घुले, सहायक दुय्यम निरीक्षक एम. टी. वरुळकर, जवान एस. डी. पवार, प्रदीप महाजन आणि शैलेश कांबळे यांच्या पथकाने १८ जानेवारी रोजी खर्डी ते आगासन दरम्यान असलेल्या खाडी किनारी भागात गावठी दारु निर्मितीच्या सहा अड्डयांवर कारवाई केली. यामध्ये रसायनाने भरलेले २०० लीटर क्षमतेचे १३९ प्लास्टीकचे ड्रम, २०० लीटर क्षमतेचे रिकामे ४० प्लास्टीकचे ड्रम, रसायनाने भरलेले दोन मोठे ढोल तसेच दोन लाख ७८ हजार लीटर दारु निर्मितीचे रसायन असा सुमारे सहा लाख ३५ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त करुन नाश केल्याची माहिती अधीक्षक नाना पाटील यांनी दिली. या धाडसत्राची कुणकुण लागताच खाडी परिसरातून दारु निर्मिती करणाºयांनी पलायन केले.