माणकोली ते चेणेदरम्यान राेज आठ दशलक्ष लीटर पाणीचाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:45+5:302021-07-10T04:27:45+5:30
मीरा रोड : मीरा-भाईंदर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाचे पाणी ठाण्याच्या माणकोली ते चेणेदरम्यान चोरी होत असल्याचा धक्कादायक ...
मीरा रोड : मीरा-भाईंदर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाचे पाणी ठाण्याच्या माणकोली ते चेणेदरम्यान चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार चेणे येथे मीटर बसवल्यानंतर उघड झाला आहे. रोजचे सुमारे सात ते आठ दशलक्ष लीटर पाणी चोरी होत आहे. या चोरीला जाणाऱ्या पाण्याचे पैसे मीरा-भाईंदर महापालिकेला भरावे लागत आहेत. पुरेसे पाणी मिळत नाहीच, शिवाय लाखोंचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
मीरा-भाईंदर शहराला स्टेमकडून रोज ८६ दशलक्ष लीटर पाणी मंजूर आहे. या रोज होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या मोजणीसाठी ठाण्याच्या माणकोली येथे मीटर बसवले आहे. पूर्वीपासूनच मीटर असून, त्यावरील रीडिंगनुसार मीरा-भाईंदर पालिकेकडून पाणी देयक वसूल केले जाते. स्टेमकडून मीटरप्रमाणे होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत पूर्वीपासून संशय होता. तो चेणे येथे मीटर बसवल्यानंतर खरा ठरला आहे.
माणकोली येथील मीटरमध्ये दाखवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याची आकडेवारी आणि चेणे येथील मीटरमधल्या आकडेवारीत मोठी तफावत आढळली आहे. माणकोली येथील मीटरमध्ये दर्शवलेल्या पाणी पुरवठ्यापेक्षा चेणे येथील मीटरची आकडेवारी पाहता रोज तब्बल सात ते आठ दशलक्ष लीटर पाणी कमी मिळत आहे; मात्र महापालिका न मिळालेल्या पाण्याचेही पैसे स्टेमला भरत आहे.
पाणी पुरवठा केंद्रापासून मीरा-भाईंदर शहर शेवटच्या टोकाला असल्याने आधीच अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा हाेताे. त्यातच स्टेमकडून मिळणारे पाणी चोरीला जात असल्याने शहराला नाहक पाणीटंचाई सहन करावी लागत आहे. शहरातील नागरिकांना २४ ते ४८ तासांनी पाणी मिळत असल्याने ते त्रस्त आहेत.
काेट
माणकोली व चेणे येथील पाण्याच्या मीटर रीडिंगमध्ये सुमारे सात ते आठ दशलक्ष लीटर पाण्याची तफावत येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत स्टेम प्राधिकरणाशी चर्चा सुरू आहे. पालिका प्रशासनही पाणी कुठे जात आहे, याचा शोध घेत आहे.
- दीपक खांबित, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग.
----------------------
खासदार राजन विचारे व आपल्या पाठपुराव्यामुळे चेणे येथे पाण्याचे मीटर लावण्यात आले. त्यामागे शहराला पाणी पूर्ण मिळते का? याचीच खात्री करायची होती. या मीटरमुळे स्टेमकडून राेज कमी पाणी मिळत असल्याचे उघड झाले आहे. या गंभीर प्रकरणी स्टेम व शासनाकडे तक्रारी करून शहराला मंजूर कोट्यानुसार पाणी मिळवून देणार आहे.
- गीता जैन, आमदार.