भर पावसातही खाद्यपदार्थांच्या हातगाड्या रस्त्यांवरच, कारवाईला मुहूर्त मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 07:43 PM2019-07-09T19:43:35+5:302019-07-09T19:43:38+5:30
रस्त्यांवर उभ्या असणा-या खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर तातडीने कारवाईचे आदेश गेल्या आठवड्यात दिले होते.
डोंबिवली: पावसाळयाच्या दिवसांमध्ये साथरोगांना आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त गोविंद बोडकेंनी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर उभ्या असणा-या खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर तातडीने कारवाईचे आदेश गेल्या आठवड्यात दिले होते. परंतु तरीही शहरात ठिकाठिकाणी हातगाड्या उभ्या असल्याचे दिसून येत आहे.
इंदिरागांधी चौक, चार रस्ता, डिएनसी शाळेजवळ, पेंढरकर महाविद्यालयालगत, शेलारनाका, गोग्रासवाडी, दत्तनगरचौक, फडके रस्ता परिसर, नेहरु रस्ता आदी भागात हातगाड्यांवरील विक्री सर्रास सुरु आहे. पावसाचा जोर कमी अधिक होत असल्याने माशांचा प्रार्दुभाव वाढला आहे. त्या माशा ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यांवर, चिखलात सर्वत्र घाणीत तसेच खाद्यपदार्थांवर बसत असल्याने रोगराईची शक्यता आहे. त्यासाठी सर्व ठिकाणी वेळीच कारवाई होणे गरजेचे आहे.
यासंदर्भात ग प्रभाग क्षेत्र अधिकारी सुर्यकांत जगताप यांनी सांगितले की, आयुक्तांचे आदेश मिळाले असून त्यावर सोमवारपासून कार्यवाही सुरु झाली आहे, लवकरच फरक दिसून येईल. नागरिकांनीही उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत, जेणेकरून असे खाद्यपदार्थ विक्री करणा-या व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळणार नाही, असे आवाहन त्यांनी केले आहे.