भाईंदर इमारतीचे पायलिंग सुरू असताना क्रेनचा पट्टा तुटून ६ टन वजनाचा पयलींग पाईप पडून अपघात
By धीरज परब | Published: March 12, 2024 06:35 PM2024-03-12T18:35:36+5:302024-03-12T18:38:51+5:30
भाईंदर पश्चिमेस उत्तनकडे जाणाऱ्या मार्गवर भोला नगर जवळ जे पी इन्फ्रा बड्या विकासकाचा इमारत बांधकाम प्रकल्प सुरु आहे.
मीरारोड - भाईंदर पश्चिमेस एका बड्या विकासकाचे इमारत बांधणीच्या कामादरम्यान पायलिंग सुरु असताना क्रेनचा पट्टा तुटून पयलींगचा भला मोठा अवजड पाईप लगतच्या रहिवासी भाग परिसरात पडला . ह्यात जीवित हानी झाली नसली तरी नुकसान झाले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे .
भाईंदर पश्चिमेस उत्तनकडे जाणाऱ्या मार्गवर भोला नगर जवळ जे पी इन्फ्रा बड्या विकासकाचा इमारत बांधकाम प्रकल्प सुरु आहे. मंगळवारी त्याठिकाणी पयलींग चे कामसुरू होते . त्यावेळी क्रेन च्या सहाय्याने पयलींग साठीचा भला मोठा पाईप उचलत असताना क्रेनचा पट्टा तुटला . सुमारे ६० फूट लांब व ६ टन वजनाचा तो पाईप लगत असलेल्या भोला नगर झोपडपट्टी येथे पडला . दोघा फेरीवाल्यांच्या हातगाड्यांचे नुकसान झाले . तसेच या घटनेने परिसरात घरांना तडे गेल्याचे रहिवाश्यानी सांगितले. एरव्ही भागात मुलं खेळत असतात व रहिवाश्यांचा वावर असतो . सुदैवाने अपघात घडला त्यावेळी कोणी नसल्याने जीवित हानी टळली.
अपघाताचे वृत्त कळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत पाईप बाजूला करण्याचे काम केले . विकासका कडून सुरक्षा उपायांचे पालन केले जात नसल्याने सदर अपघात घडला आहे . विकासक दिवस - रात्र येथे पायलिंगचे काम करत असल्याने रात्रीची झोप सुद्धा मिळत नाही व त्रास होत असल्याचा आरोप रहिवाश्यानी यावेळी केला . या प्रकरणी नुकसान झाले त्याची भरपाई मिळावी , रात्रीचे काम बंद करावे व निष्काळजीपणा बद्दल गुन्हा दाखल करावा अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे .