उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, संतप्त जमावाचा पत्रकार केतन बेटावदकर यांच्यावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 09:25 PM2017-11-27T21:25:19+5:302017-11-27T21:25:40+5:30
कल्याण: येथील पश्चिमेकडील होली क्रॉस या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणाच्या मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करीत रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
कल्याण: येथील पश्चिमेकडील होली क्रॉस या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणाच्या मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करीत रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. दरम्यान या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार केतन बेटावदकर यांच्यावरही संतप्त झालेल्या जमावाने सशस्त्र हल्ला केला. यात बेटावदकर गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना पाहता रुग्णालयासह पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. कल्याण तालुक्यातील म्हारळ गावात राहणा-या रोहित भोईर या तरुणाच्या छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी रविवारी होलीक्रॉस या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी दुपारी त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रोहितचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करीत रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
दरम्यान रोहितच्या मृत्यूचे वृत्त वा-यासारखे पसरताच तब्बल 100-200 जणांच्या जमावाने रुग्णालयावर धडक देत तेथील सामानांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. रुग्णालयातील तीन मजल्यांवरील सामानांची तोडफोड करताना जमावाने अतिदक्षता विभागही सोडला नाही. याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयात तोडफोड सुरू असल्याची माहिती मिळाल्याने त्या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकारही गेले. यावेळी पत्रकार केतन बेटावदकर यांच्यावर संतप्त जमावाने हल्ला चढविला. कोणत्यातरी हत्याराने केलेल्या हल्ल्यात बेटावदकर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ तेथील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.
रुग्णालयच्या परिसरात शेकडोंच्या संख्येने जमाव जमल्याने पोलिसांनी राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या पाचारण केल्या. संपूर्ण परिसरात तणाव पसरल्याने पत्रकारांनाही त्याठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. तब्बल चार ते पाच तास हा परिसर तणावाखाली होता. दरम्यान रोहितचा मृतदेह ताब्यात मिळताच जमाव तेथून मार्गस्थ झाला. दरम्यान पत्रकार बेटावदकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ठाणे जिल्ह्यातील सर्वच पत्नकार संघटनांनी निषेध व्यक्त करीत तातडीने हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली आहे.
महापौरांनी घटनास्थळी दिली भेट
या घटनेची माहीती मिळताच महापौर राजेंद्र देवळेकर आणि शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव यांनी रूग्णालयात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी डॉक्टरांशीही चर्चा केली तर पत्रकार बेटावदकरांच्या प्रकृतीची चौकशी केली.