भिवंडीत फटाक्यांच्या प्रदूषणापेक्षाही धुळीचे प्रदूषण जास्त, नागरिक हैराण
By नितीन पंडित | Published: October 20, 2022 03:48 PM2022-10-20T15:48:41+5:302022-10-20T15:49:58+5:30
रस्त्यावरील धुळीने प्रवाशांसह वाहतूक पोलीस हैराण
भिवंडी - दिवाळी सणा निमित्त वाजवण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याची ओरड दरवर्षी होत असते. मात्र दिवाळीच्या फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरापेक्षाही अधिक प्रदूषण सध्या शहरातील अंतर्गत व मुख्य रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे होत असल्याचे चित्र सध्या भिवंडीत पाहायला मिळत आहे. या धुळीमुळे वाहन चालकांबरोबरच प्रवासी व वाहतूक पोलिसांना या धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
भिवंडी शहरातील अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून शहराच्या बाजूला असलेल्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्गांची देखील खाड्यांमुळे प्रचंड दुरावस्था झाल्याने या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमधून प्रचंड धूळ उडत आहे. दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे खड्ड्यांमध्ये धुळीचा त्रास शहरात व टोल रस्त्यांवर वाढला आहे. ज्याचा नाहक त्रास वाहन चालकांबरोबरच वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांनाही होत आहे.
भिवंडीतील चिंचोटी अंजुरफाटा मानकोली रस्त्याची दुरावस्था झाल्याने या रस्त्यावर अनेक ठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरले असून खारबाव व अंजुरफाटा येथे धुळीने नागरिक हैराण झाले आहेत.तर भिवंडी कशेळी रस्त्यावर उडणाऱ्या धुळीने देखील नागरिक हैराण झाले आहेत. या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी व नागरिकांची या धुळीपासून मुक्तता करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र मनपा प्रशासनासह संबंधित टोल कंपन्या देखील त्याकडे दुर्लक्ष करत असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे ही त्याकडे पुरता दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.