ठाण्यातील राज्य कामगार रुग्णालय वसाहतीमध्ये धुळीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:33 PM2019-02-18T22:33:18+5:302019-02-18T22:44:20+5:30
ठाण्याच्या वागळे इस्टेट भागातील राज्य वीमा कामगार योजनेतील रुग्णालयीन कर्मचा-यांच्या १९ अति धोकादायक निवासी इमारती पाडल्यानंतर झालेला मातीचा ढिगारा ठेकेदाराने तिथेच पसरविला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे.
ठाणे: ठाणे महापालिकेने राज्य कामगार वीमा रुग्णालय वसाहतीच्या १९ निवासी इमारती अति धोकादायक असल्याचे घोषित केले आहे. रिक्त झालेल्या या इमारती पाडणा-या ठेकेदाराच्या गलथानपणामुळे या परिसरात आता धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीच्या त्रासामुळे येथील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वागळे इस्टेट येथील राज्य कामगार वीमा योजनेच्या निवासी वसाहतींपैकी १९ इमारती अतिधोकादायक म्हणून ठामपाने घोषित केल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक क्षत्रिय इन्फ्रास्ट्रक्चर यांना दिले होते. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या ठेकेदारामार्फत १९ इमारती पाडण्याचे काम सुरु होते. इमारती पाडल्यानंतर मातीचा ढिगारा आणि इतर साहित्य बाहेर विल्हेवाटीसाठी नेणेही अपेक्षित होते. परंतू, रेबिट आणि माती इमारतींच्या ठिकाणी पसरविण्यात आली. कामगार रुग्णालयातील इतर निवासी इमारतींमधील रस्ते नाल्यांवर ही माती पडल्यामुळे या परिसरात घाणीचेही साम्राज्य पसरले आहे. तर धुळीमुळे येथील रहिवाशांना दमा, खोकला आणि इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे. पहिला वर्गाला तर दिवसातून सात ते आठ वेळा केवळ स्वच्छता मोहीम राबवावी लागत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने याठिकाणचा संपूर्ण ढिगारा उचलावा तरच त्याचे बिल अदा करावे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे इमारत क्रमांक नऊ आणि १२ च्या मागे तर मलनि:सारण टाकी होती. या टाकीमध्येही ही माती टाकण्यात आल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. आगामी काळात तर या धुळीचा आणखी त्रास होणार असल्यामुळे ही माती या परिसरातून हटविण्यात यावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.