आईचा मृत्यू झाला असताना बजावले कर्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 12:27 AM2020-06-02T00:27:53+5:302020-06-02T00:28:13+5:30
कल्याणमधील घटना : प्रसूतीकरिता आलेल्या महिलेस डॉक्टरने दिला दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याणमधील डॉ. अश्वीन कक्कर यांच्या रुग्णालयात एक गरोदर महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. तिला प्रसूतीच्या कळा सुरु झाल्या तेव्हा डॉक्टरांच्या घरातून आईचा आजारी असल्याचा फोन आला. डॉक्टर घरी जाऊन आईला भेटून लागलीच आले आणि महिलेची प्रसूती करण्याचे कर्तव्य प्रथम बजावले. इकडे डॉक्टर कर्तव्य बजावत असताना तिकडे त्यांच्या आईचा मृत्यू झाला. आई आजारी असतानाही कर्तव्याला महत्त्व देणाऱ्या डॉ. कक्कर यांनी ‘कर्तव्याने घडतो माणूस...’ या गीताच्या ओळी आपल्या कृतीतून सार्थ ठरविल्या आहेत.
कल्याण पूर्वेतील कचोरे परिसरात राहणारी सबा शेख ही महिला आठ महिन्यांची गरोदर होती. १ मे रोजी ती कळव्यातील तिच्या सासरी गेली होती. कळव्यातील सरकारी रुग्णालयात तिची प्रसूती होणार होती. मात्र, त्याठिकाणी तिला चांगली वागणूक दिली गेली नाही. वास्तविक पाहता एका सामाजिक कार्यकर्त्याने तिला कल्याणहून ठाण्यापर्यंत रुग्णवाहिका करुन दिली होती. रुग्णालयात नीट वागणूक न मिळालेल्या सबाने तिच्या सासरी जाण्याचा निर्णय घेतला. त्याठिकाणीही खोली अत्यंत लहान असल्याने तिच्या सासरच्या मंडळीने तिला कल्याणला जा, असे सांगितले. लॉकडाउनमुळे कल्याण कसे गाठायचे, असा प्रश्न तिच्यापुढे होता. तिला एक तीन वर्षांचा मुलगाही आहे. आठ महिन्यांच्या गरोदर महिलेने भरउन्हात तीन वर्षांच्या मुलासह कळवा ते कल्याण रेल्वे ट्रॅकने चालत कल्याण गाठले.
या महिलेच्या प्रसूतीची तारीख जवळ येत असल्याने सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा कानवडे यांनी तिची व्यथा सोशल मीडियावर प्रसृत केली. हा मेसेज डॉ. कक्कर यांनी पाहिला. डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णालयात सबाची नि:शुल्क प्रसूती करण्याचे ठरवले. सबाला रुग्णालयात दाखल केले गेले. सबाला प्रसूतिकळा सुरू झाल्या त्याचवेळी डॉक्टरांच्या आईची तब्येत बिघडल्याचा फोन आला. डॉक्टर घरी जाऊन आईला भेटून पुन्हा तातडीने रुग्णालयात आले. सबाची प्रसूती सुरु असताना डॉक्टरांच्या आईचे निधन झाले. सबाने गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर डॉक्टरांनी घरी जाऊन आईच्या अंत्यविधीची तयारी केली. काल अंत्यविधी करुन ते आज पुन्हा कर्तव्य बजावण्यासाठी रुग्णालयात हजर असल्याचे सांगितले.
डॉ. अश्वीन कक्कर यांच्या ७० वर्षांच्या आई मधुलिका या आजारी होत्या. मधुलिका या वाणी विद्यालयात शिक्षिका होत्या. मधुलिका यांनी त्यांचा मुलगा अश्वीन याला डॉक्टर केले. डॉक्टर झालेल्या मुलावर ‘आधी कर्तव्य बजावले पाहिजे’, असे संस्कार आईने रुजवले होते. आईने दिलेल्या संस्कारांचा वसा घेऊन काम करणारे डॉ. कक्कर यांना आईच्या मृत्यूसमयी तिच्याजवळ उपस्थित राहता आले नाही. त्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे.