ज्येष्ठ दिग्दर्शक, लेखक दत्ता केशव यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 09:45 PM2019-01-17T21:45:04+5:302019-01-17T21:45:13+5:30
ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक दत्ता केशव यांचे आज गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले.
मीरा रोड - ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक दत्ता केशव यांचे आज गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. उद्या शुक्रवारी सकाळी ११ वा. भाईंदर येथील वैकुंठभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
१९६४ सालापासून दत्ता केशव कुलकर्णी यांनी चित्रपट व नाट्य क्षेत्रात आपली कारकीर्द सुरू केली. सिने-नाट्य क्षेत्रातील सुमारे ४२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट, नाटक, मालिकांसाठी पटकथा, संवाद, गीते व दिग्दर्शन केले. दोन चित्रपटातून त्यांनी अभिनयसुद्धा केला. त्यांनी ४ डॉक्युमेंटरी फिल्म बनवल्या.
शासनाच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासह आचार्य अत्रे पुरस्कार, राम गणेश गडकरी पुरस्कार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना सागर, संगीत, संगम व अस्मिता अशी मुलं असून सागर लेखक तर संगीत निर्माता - दिग्दर्शक आहे. शुक्रवारी सकाळी भाईंदर पश्चिमेस दत्त मंदिरासमोरील केशव पार्क येथील निवास स्थानावरून त्यांच्या अंतिम यात्रेस सुरुवात होईल.