दहा पोलिसांवर बडतर्फीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:21 AM2019-09-20T00:21:46+5:302019-09-20T00:21:50+5:30
शासकीय नोकरी मिळाल्यावर आपले कोणी काहीही वाकडे करू शकत नाही, असा गैरसमज बऱ्याच जणांना असतो.
ठाणे : शासकीय नोकरी मिळाल्यावर आपले कोणी काहीही वाकडे करू शकत नाही, असा गैरसमज बऱ्याच जणांना असतो. मात्र, त्याला छेद देत ठाणे शहर पोलिसांनी तब्बल १० जणांना कायमचा घरचा रस्ता दाखवला आहे. त्यातच, वारंवार गैरहजर राहणे, ने-आण करताना आरोपीने पलायन करणे, गुन्ह्णाच्या तपासात हलगर्जी करणे, बंदोबस्ताला उपस्थित न राहणे यासारख्या विविध प्रकरणांत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील तब्बल ३५६ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांची चौकशी करून त्यांना वेगवेगळ्या शिक्षा केल्या आहेत. त्यातच, घरी बसवलेल्या कर्मचाºयांमुळे पोलीस आयुक्तालयात रिक्त झालेल्या १० जागा येत्या पोलीस भरतीच्या प्रक्रियेत भरण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी-कर्मचाºयांच्या विविध प्रकरणांची चौकशी प्रलंबित होती. त्यातून ठाणे शहर पोलिसांची बदनामी होऊ लागल्याने शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी लक्ष देत तातडीने ही प्रकरणे मार्गी लावल्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलीस विभागामार्फत जानेवारी ते आॅगस्ट २०१९ दरम्यान ३५६ जणांची चौकशी करून ती प्रकरणे निकाली काढली. त्यामध्ये १० जणांवर बडतर्फीची कारवाई, तर काहींना सक्तीची ताकीद, दंड, मूळ वेतनावर ठेवणे अशा प्रकारे विविध शिक्षा केल्या आहेत.