महापौर विनीता राणे यांना डावलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:18 AM2018-12-01T00:18:04+5:302018-12-01T00:18:06+5:30
डोंबिवली : शहरात शनिवारी होणाऱ्या श्रीनिवास मंगल महोत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याचे निमंत्रक खासदार डॉ. श्रीकांत ...
डोंबिवली : शहरात शनिवारी होणाऱ्या श्रीनिवास मंगल महोत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याचे निमंत्रक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार सुभाष भोईर यांनी शहरात ठिकठिकाणी महोत्सवाचे बॅनर लावले आहेत. मात्र, त्यात कल्याण-डोंबिवलीच्या प्रथम नागरिक महापौर विनीता राणे यांना डावलल्याची भावना त्यांच्या निकटवर्तीयांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
श्रीनिवास मंगल महोत्सवाच्या निमित्ताने शोभायात्रा, पालखी काढण्यात येणार आहे. सकाळपासून विविध धार्मिक विधी होणार आहेत. क्रीडासंकुलामध्ये एक हजार भाविकांचा विवाह सोहळा, कुंकुमार्चन, महाप्रसाद, बालाजीचा विवाह सोहळा आदी कार्यक्रम होणार आहेत. त्यानिमित्ताने केलेली विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
महोत्सवाच्या प्रसिद्धीसाठी शहरात ठिकठिकाणी पत्रके वाटण्यात आली आहेत. बॅनर, पोस्टर्स झळकत आहे. मात्र, त्यावर महापौरांचा उल्लेख नाही. महोत्सवाप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. असे असताना महापौर राणे यांना मात्र या महोत्सवापासून लांब ठेवल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे.
डोंबिवलीत आज वाहतुकीत बदल
ठाणे : सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडांगण डोंबिवली येथे १ डिसेंबरला श्रीनिवास मंगल महोत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमानिमित्त वाहतूक सुरळीत राहावी, म्हणून पोलीस उपआयुक्त वाहतूक अमित काळे यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करून सकाळी ६ वाजेपासून कल्याणफाटा, शीळ रोडमार्गे डोंबिवली स्थानकाकडे तसेच रिजन्सी अनंतम व विकोनाका येथून डावीकडे जाणाºया सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.
बंदी घातलेल्या वाहनांना (या जड-अवजड वाहने वगळून) कल्याण-शीळ रोडने मानपाडा पोलीस स्टेशन-टाटानाका येथून डावीकडे खंबाळपाड्याकडे वळून जाता येईल. तसेच कल्याण-शीळमार्गे डोंबिवली स्थानकाकडे जाणारी वाहने मानपाडा सर्कल येथूनच डावीकडे डोंबिवलीत वळतील व ती स्टार कॉलनीमार्गे जातील.
खारेगाव टोलनाका, मुंब्रा बायपास, शीळफाट्यापासून नवी मुंबईकडे जाणाºया वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी आहे. याठिकाणी येणारी वाहने कापूरबावडी उड्डाणपूल- कॅडबरी जंक्शन-आनंदनगर चेकनाका-मुलुंड-ऐरोलीमार्गे जातील. लागू केलेली ही अधिसूचना रात्री ११ वाजेपर्यंत लागू राहील.