उग्र वासाने डोंबिवली त्रस्त, उलटी, डोकेदुखी, जुलाब, मळमळण्याचा त्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 01:18 AM2019-01-21T01:18:35+5:302019-01-21T01:18:41+5:30
एमआयडीसी विभागातील सागाव, सागर्ली आणि सोनारपाडा परिसरातील रहिवासी दोन दिवसांपासून केमिकलच्या उग्र वासाने भयभीत झाले आहेत.
डोंबिवली : एमआयडीसी विभागातील सागाव, सागर्ली आणि सोनारपाडा परिसरातील रहिवासी दोन दिवसांपासून केमिकलच्या उग्र वासाने भयभीत झाले आहेत. उलटी, जुलाब, डोकेदुखी, डोळे चुरचुरणे तसेच मळमळ अशा आजारांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. केमिकल कंपन्या कोणतीही प्रक्रिया न करताच त्यांचे सांडपाणी थेट नाल्यात सोडत असल्याचा आरोप रहिवाशांचा असून संबंधित कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, सीईटीपीच्या अधिकाऱ्यांनी नाल्यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. यावरून कोणत्या कंपनीचे केमिकल नाल्यात सोडण्यात आले होते, हे स्पष्ट होणार आहे.
एमआयडीसी परिसरात राहणाºया रहिवाशांना वायुप्रदूषण नवीन नाही; पण फेज-२ मधील सागाव, सागर्ली आणि सोनारपाड्यामधील रहिवासी दोन दिवसांपासून केमिकलच्या उग्र वासामुळे पुरते हैराण झाले आहेत. यात या वासामुळे त्यांचे आरोग्य बिघडल्याने स्थानिक नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या मनीषा राणे, रमेश मिश्रा आदी मंडळींनी शनिवारी रात्री त्या परिसराला भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतली. दिवसाही केमिकलचा उग्र वास येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या वासामुळे जीव घुसमटत असून चक्कर, डोकेदुखी, उलट्या आदी त्रास होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दोन, तीन दिवसांपासून हा त्रास अधिक जाणवू लागला आहे. हे थांबले नाही, तर झोपेतच आमचे जीव जातील, अशी भीतीही रहिवाशांनी व्यक्त केली. ज्या नाल्यातून केमिकल सोडण्यात आले होते, तेथील पाण्याचे नमुने सीईटीपीच्या अधिकाºयांनी घेतल्याची माहिती स्थानिक रहिवासी संदीप नाईक यांनी दिली. आम्हीही नमुने घेतले असून त्याचीही तपासणी केली जाणार आहे. तसेच यासंदर्भात स्थानिक मानपाडा पोलीस ठाण्यात पत्रदेखील दिले असून यात जी कंपनी दोषी आहे, तिच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आल्याचे नाईक म्हणाले. दरम्यान, सीईटीपीचे देवेन सोनी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
>हिरव्या पावसाचा आज नोंदवणार निषेध
२१ जानेवारी २०१४ ला सकाळी
७ च्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वत्र हिरव्या रंगाची चादर पसरली होती. हा प्रकार त्यावेळी खूपच गाजला होता. प्रदूषण केल्याप्रकरणी एका कंपनीवर कारवाईही करण्यात आली. संबंधित कंपनीला इंजिनीअरिंग वस्तू बनवण्याची परवानगी असताना तिथे बेकायदा रासायनिक रंग बनवले जात होते. याचे कण हवेत जाऊन त्यावर पावसाचे पाणी पडल्याने सर्वत्र हिरवा रंग दिसून आला होता. हे चित्र एमआयडीसीतील सर्वच रस्ते तसेच इमारतींमधील टेरेसवर पाहावयास मिळाले होते.दरम्यान, या घटनेची आठवण म्हणून दरवर्षीप्रमाणे सोमवारीही निषेध दिन पाळला जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली. सोमवारी फलकाद्वारे याचा निषेध नोंदविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.