ई तिकिटामुळे टीएमटी डिजिटल

By admin | Published: June 22, 2017 12:01 AM2017-06-22T00:01:42+5:302017-06-22T00:01:42+5:30

बासणात गुंडाळून ठेवलेला ई तिकीटाचा प्रस्ताव टीएमटी अर्थात ठाणे परिवहन सेवेने चार वर्षानंतर पुन्हा बाहेर काढल्यानंतर मंगळवारी झालेल्या महासभेत त्याला अखेर मंजुरी मिळाली आहे.

E-ticket TMT digital | ई तिकिटामुळे टीएमटी डिजिटल

ई तिकिटामुळे टीएमटी डिजिटल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बासणात गुंडाळून ठेवलेला ई तिकीटाचा प्रस्ताव टीएमटी अर्थात ठाणे परिवहन सेवेने चार वर्षानंतर पुन्हा बाहेर काढल्यानंतर मंगळवारी झालेल्या महासभेत त्याला अखेर मंजुरी मिळाली आहे. या प्रस्तावानुसार ठाणेकरांना एकाच वेळेस अनेक फायदे मिळणार आहेत. तिकीट काढण्याबरोबरच प्रवासी पास आणि विद्यार्थी पासचेही व्हेरीफीकेशन, क्रेडिट कार्ड स्वॅप करणे तसेच मोबाइलवरदेखील त्याला एका अ‍ॅपच्या सहाय्याने तिकीट काढता येणार असून त्याचा वेळ वाचणार आहे. याशिवाय एखाद्या ठिकाणी बस बंद पडली असेल तर त्याचा या मशिनच्या सहाय्याने फोटो काढून तो तत्काळ कार्यशाळेला पाठविण्यास मदत होणार आहे.
या तिकीट प्रणालीमुळे वाहकाकडे नेमकी कीती कॅश आहे, किती तिकीट दिले गेले आणि तो प्रवासादरम्यान नेमका कुठे आहे, याची सर्व माहिती परिवहन प्रशासनाला एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यापूर्वी जो तिकीटविक्रीमध्ये भ्रष्टाचार होत होता, त्याला आळा बसेल, असा विश्वास परिवहनला आहे.
ठाणे परिवहन सेवेने २०११ मध्ये ई तिकीटची सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर यासाठी तीन वेळा निविदा काढल्या. परंतु त्याला प्रतिसादच मिळाला नाही. असे असतांना महापालिकेने याचा प्रायोगिक तत्वावर वापर केला. परंतु, त्यात त्रुटी आढळल्याने परिवहनने हा प्रस्ताव अखेर बासणात गुंडाळला.
परिवहन सेवेमध्ये जेएनएनयूआरएम अंतर्गत टप्याटप्याने २३० नव्या बस दाखल होत आहेत. त्यानुसार आता प्रशासनाने ई तिकीटाचा प्रस्ताव नव्याने तयार केला असून हा धोरणात्मक निर्णय असल्याने तो प्रस्ताव महासभेत सादर झाला होता. त्यात काही बदल सुचवून महासभेने याला मंजुरी दिली. त्यानुसार ई तिकीटाचे हे काम आता बीओटी तत्त्वावर करण्यात येणार असून यासाठी दरवर्षी २ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार पुढील सात वर्षांसाठी हे काम खाजगी ठेकेदाराला देण्यात येणार आहे.
सध्या परिवहनच्या ताफ्यात ३१३ बस असून रस्त्यावर ३०५ च्या आसपास धावत आहेत. परंतु, जेएनएनयूआरएम अंतर्गत टप्याटप्याने २३० बस दाखल होत असून १०० इलेक्ट्रीक आणि १०० बायोइथेनॉलवर धावणाऱ्या बस घेण्याचे प्रस्तावित केले आहे. ही बाब लक्षात घेता ई तिकीटींग कार्यप्रणाली लागू करतांना नव्याने ताफ्यात दाखल होणाऱ्या बसचाही अंतर्भाव करण्यात येणार आहे. त्यामुळे ई तिकीटींगमध्ये यंत्रणेमध्ये वाढ करावी लागणार आहे. भविष्यात दाखल होणाऱ्या बसचा विचार करता एकूण १२०० ई तिकीट मशिन्स आवश्यक असणार आहेत. तसेच ही प्रणाली लागू करण्यासाठी डेटा सेंटर, सॉफ्टवेअर, हॉर्डवेअर व देखभाल दुरुस्ती, कॉमन मोबिलीटी कार्ड, तिकीट व रोखा विभागाचे दैंनदिन कामकाज, विद्यार्थी पास वितरण, तांत्रिक कर्मचारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, तसेच वाढीव बसेसचा विचार करता परिवहनमध्ये चार लाख प्रवासी सुद्धा भविष्यात होऊ शकतात. त्यानुसार एकूण प्रवासी ४ लाख अपेक्षित धरुन प्रती तिकीट १० पैसे खर्च व त्यावरील सेवाकर १२.३६ टक्के विचारात घेता २ कोटी ५० लाख अधिक सेवा कर असा प्रती वर्षी खर्च अपेक्षित धरला आहे.
ई तिकीटची ही सेवा बीओटीवर सुरु होणार असल्याने सध्याच्या दोन्ही ठेकेदारांचा ठेका रद्द करावा लागेल. परंतु, या सेवेमुळे वाहकांना एक प्रकारे शिस्त लावण्याचा विचार यातून केला गेला आहे. वाहकांमार्फत होणारे तिकीट घोळ, बोगस तिकीट छपाई या सर्वांना आळा बसणार असल्याचे परिवहनने स्पष्ट केले आहे. वाहकाने किती तिकीटे दिली, त्यातून किती पैसे मिळाले, तो सध्या कोणत्या स्पॉटवर आहे, याची सर्व माहिती परिवहनला एका क्लिकवर मिळणार आहे.

Web Title: E-ticket TMT digital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.