‘ई’ प्रभाग कार्यालयात दिला ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 12:38 AM2018-08-25T00:38:47+5:302018-08-25T00:39:43+5:30
प्रभाग समितीची सभा सुरू असताना महिलांबरोबर सभापतींनीही ठिय्या धरला
कल्याण : पाणीटंचाईमुळे त्रस्त असलेल्या केडीएमसीच्या २७ गावांतील महिलांनी शुक्रवारी ई प्रभाग कार्यालयावर धाव घेतली. यावेळी तेथे प्रभाग समितीची सभा सुरू असताना महिलांबरोबर सभापतींनीही ठिय्या धरला. अधिकारी सभेला गैरहजर राहिल्याने नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना त्यांनी एक तास प्रवेशद्वाराजवळच रोखून धरले. अखेरीस उपायुक्त आल्यानंतर नगरसेवकांनी ठिय्या मागे घेतला.
ई प्रभाग समितीची सभा चार महिन्यांनंतर शुक्रवारी होती. यावेळी प्रभाग अधिकारी रवींद्र गायकवाड उपस्थित नव्हते. त्यामुळे प्रभाग समितीच्या सभापती पूजा म्हात्रे, प्रमिला पाटील, सुनीता पाटील, प्रभाकर जाधव, प्रेमा म्हात्रे, रूपाली म्हात्रे आदी १२ नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन सुुरू केले. याचवेळी पाणीसमस्येने त्रस्त असलेल्या महिलांनी प्रभागात धाव घेतली होती. या महिलांसह प्रभाग समिती सदस्य व सभापतींनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
नगरसेवक प्रभाकर जाधव यांनी सांगितले की, नागरिकांना पाणी मिळत नाही. रस्त्यांवरील खड्डे बुजवले गेले नाहीत. गणेशोत्सव जवळ आला आहे. नागरिकांचे हाल कुत्रे खात नाही. अधिकारी जर गावात आले, तर लोक त्यांना चपलेने मारतील. प्रभाग समितीच्या सभेला अधिकारी दाद देत नाही. नागरिक प्रभाग समितीत येऊन जाब विचारतात. योग्य उत्तरे त्यांना दिली जात नाही. सभेला प्रभाग अधिकारीच नाही. सक्षम अधिकारी नसल्याने प्रशासनाच्या वतीने उत्तरे कोण देणार.
आयुक्तांनी दोनच दिवसांपूर्वी नांदिवली परिसराचा दौरा केला, तेव्हा अधिकारीवर्गाची कानउघाडणी केली होती. लोकांच्या समस्या न सोडवता काय झोपा काढता का, असा संतप्त सवाल आयुक्तांनीच उपस्थित केला होता. त्यानंतर, शुक्रवारी पुन्हा अधिकाºयांच्या निर्ढावलेल्या वृत्तीचा प्रत्यय ई प्रभाग कार्यालयाशी संलग्न असलेल्या २७ गावांमधील नगरसेवकांना आला. त्यामुळे महिलांनी प्रभाग कार्यालयात चक्क गोंधळ घातला. सभापतींनीही त्याला जोरदार समर्थन दिले.
अधिकाºयांवर करणार कारवाई; उपायुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
नगरसेवकांच्या गोंधळानंतर प्रभाग अधिकारी रवींद्र गायकवाड कार्यालयात आले, तेव्हा त्यांना कार्यालयात न घेता प्रवेशद्वारावर ताटकळत रोखून धरले गेले. उशिरा येणाºया अधिकाºयांवर काय कार्यवाही करणार, असा सवाल नगरसेवकांनी केला.
अखेरीस उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी ई प्रभाग कार्यालय गाठले. संतप्त झालेल्या नगरसेवकांची त्यांनी समजूत काढत गैरहजर राहणाºया अधिकाºयांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यावर नगरसेवकांनी तीन तासांनंतर आंदोलन मागे घेतले.