ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीवर आता भर
By Admin | Published: July 5, 2017 06:08 AM2017-07-05T06:08:16+5:302017-07-05T06:08:16+5:30
घनकचरा व्यवस्थापन आणि केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये केडीएमसीच्यावतीने
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : घनकचरा व्यवस्थापन आणि केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये केडीएमसीच्यावतीने विविध उपक्रम प्रस्तावित केले गेले असताना आता ‘घातक कचरा’ या स्वरूपात मोडणाऱ्या ई-कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित संस्थांचा शोध सुरू केला आहे.
केडीएमसी हद्दीत कचरा विल्हेवाटीची समस्या जटील बनत आहे. आधारवाडीतील डम्पिंगची क्षमता संपली आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने विविध ठिकाणी बायोगॅस प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यातच १५ जुलैपासून पूर्णपणे प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंधन घालण्याचे आदेश महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिले आहेत.
दरम्यान, ओला-सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबरोबरच घातक कचरा म्हणविणाऱ्या ई कचऱ्याचे विघटन करण्याच्या दृष्टीने संबंधित संस्थांना केडीएमसीने आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. ई-कचरा गोळा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणाऱ्या व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदणी असणाऱ्या व्यावसायिकांनी १५ जुलैपर्यंत लेखी अर्ज सादर करावेत, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी केले आहे.
ठिकठिकाणी कचरा गोळा करणार
घातक कचऱ्यामध्ये बॅटऱ्या, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदी कचऱ्याचा समावेश आहे. हा ई-कचरा गोळा करण्यासाठी पालिकेतर्फे प्रत्येक प्रभागक्षेत्र कार्यालय तसेच उपलब्धतेनुसार महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालये, हजेरीशेड, वाहनतळ येथे ई-कचरा गोळा करण्यासाठी बॉक्स ठेवण्यासाठी जागा उपलब्ध दिली जाणार आहे.