भूकंपाने पुन्हा हादरले डहाणू-तलासरीवासी; तीन वर्षांपासून भूकंप-मालिका सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 11:38 PM2020-09-07T23:38:35+5:302020-09-07T23:38:55+5:30
डहाणूतील धुंदलवाडी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू, अनेक घरांची पडझड आणि भिंतींना तडे
कासा/तलासरी : पालघर जिल्ह्यातीतल डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये पुन्हा भूकंपाचे हादरे बसत असून यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंपाने काही घरांची पडझड, तर हजारो घरांच्या भिंतींना आतापर्यंत तडे गेले आहेत. डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, दोन्ही तालुक्यांतील गावांमधील अनेक घरांचे आतापर्र्यंत नुकसान झाले असून मागील वर्षी दोघांचा भूकंपाने मृत्यू झाला होता.
डहाणूमध्ये सोमवारी सकाळी ८ वाजून ७ मिनिटांनी ३.५ रिश्टर स्केलचा हादरा बसला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सतत लहान-मोठे भूकंपाचे धक्के बसत असून ४ आणि ५ सप्टेंबर रोजी एकूण चार भूकंपाचे धक्के बसले होते. हे भूकंपाचे धक्के विशेषत: डहाणू आणि तलासरी ग्रामीण आणि किनारपट्टीतील गावांना बसले आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असून काही ठिकाणी नागरिकांनी रात्र जागून काढली. ४ सप्टेंबर रोजी बसलेल्या चार धक्क्यांमध्ये ४ रिश्टर तीव्रतेचा सर्वाधिक मोठा धक्का बसला होता. त्या भूकंपाच्या हादऱ्याची तीव्रता धुंदलवाडी, चिंचले, सासवंद, आंबोली, धानिवारी, ओसारविरा, महालक्ष्मी, सोनाळे, कासा, चारोटी, पेठ, उर्से आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जाणवली होती.
दरम्यान, भूकंपामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. भूकंप हादऱ्यांनी घरांचे छप्पर, भांडी हलत असल्याने धुंदलवाडी परिसरातील नागरिकांना भीतीने रात्र घराबाहेर काढावी लागत असल्याचे संदीप भसरा व नरेश भोये यांनी सांगितले. भूकंपाची झोपड्यांपेक्षा पक्क्या घरांना तीव्रता अधिक जाणवली. ४ सप्टेंबरच्या भूकंपाच्या हादºयाने डहाणू तालुक्यातील सासवंद गावातील धर्मा डोंबरे या आदिवासी शेतकºयाचे घर कोसळले, तर चिंचले गावातील दत्तू पडवळे यांच्या घराचा काही भाग कोसळून मोठे नुकसान झाले.
दुहेरी संकटात सापडले नागरिक
च्सुदैवाने या दोन्हीही घटनांत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर काही गावांतील घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. जिल्ह्यात
३ नोव्हेंबर २०१८ पासून भूकंपाचे धक्के बसत असून आजवर हजारो घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. च्एकीकडे कोरोना संकट तर दुसरीकडे भूकंपाची भीती या दुहेरी संकटात येथील नागरिक सापडले आहेत. त्यांना भीतीने जीवन जगावे लागत आहे. दरम्यान, डहाणू तालुक्यात मागील वर्षी भूकंपात घर कोसळून बेंडगाव येथील रिश्या मेघवाले यांचा मृत्यू झाला होता, तर हळदपाडा येथील वैभवी भुयाल या चिमुकलीला जीव गमवावा लागला होता.