सहज सुचलेल्या चाली, गीते अधिक लोकप्रिय - अशोक पत्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 04:10 AM2018-06-12T04:10:14+5:302018-06-12T04:10:14+5:30
सहज सुचलेली चाल किंवा कविता लोकांना आपल्या अधिक जवळची वाटते. अशा चाली व गीतांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे, असे मत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केले.
कल्याण : तुमचे काम चांगले असेल, तर तुम्हाला कुणाकडेही जावे लागत नाही. संधी आपोआपच चालत येते. कोणतीही चाल किंवा कविता विचार करून केली, तर ती अधिक क्लिष्ट होते. त्यापेक्षा सहज सुचलेली चाल किंवा कविता लोकांना आपल्या अधिक जवळची वाटते. अशा चाली व गीतांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे, असे मत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केले.
सुभेदारवाडा कट्ट्याच्या तृतीय वर्षपूर्ती कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात रविवारी ‘सप्तसूर माझे...’ याअंतर्गत पत्की यांची संगीतमय मुलाखत पूर्वा कर्वे-बापट यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
पत्की म्हणाले, ‘केतकीच्या वनी, नाचला गं मोर’ यासारख्या गाण्यात मेलोडी होती. १९७२ मध्ये या गाण्याचे ध्वनिमुद्रण झाले. त्यानंतर, अशोक पत्की हे नाव लोकप्रिय झाले. ही गाणी ५०-६० वर्षांच्या काळ लोटला असला, तरी ती आजची वाटतात. दैवीकृपा असावी लागते, तेव्हा उत्कृष्ट निर्मिती आपल्या हातून होते. चांगली निर्मिती केली की, काम आपोआपच आपल्याकडे चालत येते. माझ्याबाबतीत सिनेमाचेही तेच झाले. एक काम झाले की, दुसरी कामे आपोआप चालत आली. कोणतेही काम हे मनापासून केले पाहिजे. ‘आपली माणसं’ यासाठी पुरस्कार मिळू देत, म्हणून मी देवाकडे प्रार्थना केली होती. त्यानंतर, १० वर्षे पुरस्कार नाही मिळाला तरी चालेल, पण आज लाज ठेव, असे गाºहाणे घातले. त्यानुसार, ‘आपली माणसं’ याला पुरस्कार मिळाला. पुढच्या १० वर्षांत एकही पुरस्कार मिळाला नाही, असे त्यांनी सांगितले.
वसंत प्रभू, राम कदम, गदिमा, पी. सावळाराम ही माणसे प्रथम गाणे लिहीत. मग, त्यांचे ध्वनिमुद्रण होत असे. पण, माझ्या काळात चाल बनवून मग गाणी लिहिण्याचा एक ट्रेण्ड आला. शांताराम नांदगावकर यांच्याकडून गाणे लिहून घेणार होतो. त्या चालीवर मी डमी गाणे बसवले होते. या गाण्याचे बोल छान असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. त्या गाण्याचा अंतरा त्यांनी लिहिला. तिथूनच पुढे गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. त्यानंतर, सुरेश वाडकर यांच्यासाठी ‘तू सप्तसूर माझे’ हे गीत लिहिले.
प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध
‘केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर’, ‘तू सप्तसूर माझे तू श्वास अंतरीचा’, ‘राधा ही बावरी’, ‘टांग टिंग टिंगाक, टांग टिंग टिंगाक’, ‘मला सांगा सुख म्हणजे नक्कीकाय असतं’... या गीतांसोबतच ‘आभाळमाया’ आणि ‘वादळवाट’ ही मालिकांची शीर्षकगीते सादर क रून पत्की यांनी प्रेक्षकांची टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळवली.
‘अधुरी एक कहाणी’ आणि ‘यमुना जळी खेळू खेळ कन्हैया’ या जुन्या गाण्यांना त्यांनी दिलेल्या चाली त्यांनी प्रेक्षकांसमोर सादर केल्या. पत्की यांनी काही जिंग्लसही सादर केल्या. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या लोकप्रिय गाण्याच्या निर्मितीचे मर्म त्यांनी उलगडून सांगितले.