खा. शिंदे यांच्यापेक्षा राज्यमंत्री चव्हाण ‘वजनदार’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 01:16 AM2018-12-02T01:16:25+5:302018-12-02T01:16:37+5:30

लोकसभा व विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे कल्याण-डोंबिवलीत कुणाचे वजन जास्त, अशी चर्चा रंगू लागली आहे.

Eat Chavan's 'weighty' minister than Shinde | खा. शिंदे यांच्यापेक्षा राज्यमंत्री चव्हाण ‘वजनदार’

खा. शिंदे यांच्यापेक्षा राज्यमंत्री चव्हाण ‘वजनदार’

Next

- अनिकेत घमंडी

डोंबिवली : लोकसभा व विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे कल्याण-डोंबिवलीत कुणाचे वजन जास्त, अशी चर्चा रंगू लागली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे व खा. डॉ. श्रीकांत शिंदे या पिता-पुत्रांचे वजन जास्त की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘ब्ल्यू आइड बॉय’ राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे जास्त, अशी चुरस वाढणार आहे. मात्र शनिवारी श्रीनिवास कल्याण महोत्सवात जेव्हा वेगवेगळ््या नेत्यांची धान्य, गायीचे तूप आदी जिन्नसाने तुला करण्यात आली तेव्हा राज्यमंत्री चव्हाण यांचे शारीरिक वजन हे खा. डॉ. शिंदे यांच्यापेक्षा चांगलेच जास्त भरले. अर्थात पिताश्री एकनाथ यांनी आपले वजन पुत्राच्या पारड्यात टाकले असते तर कोणते चित्र दिसले असते, अशी खुसखुशीत चर्चा रंगली आहे. खा. शिंदे यांची सुट्या पैशाने तर राज्यमंत्री चव्हाण यांची धान्याने तुला केली गेली.
पूर्वेतील ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रीडासंकुलात शनिवारी पहाटे श्रीनिवास कल्याण महोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी झालेल्या तुला सोहळ्यात खा. शिंदे, राज्यमंत्री चव्हाण आणि आमदार सुभाष भोईर यांनीही सहभाग घेतला. भाजपाच्या चव्हाण यांचे वजन जास्त भरल्याने शिवसेनेच्या खासदार, आमदारांपेक्षा राज्यमंत्री ‘भारी’ ठरल्याची चर्चा रंगली होती.
लग्न, कुंकुमार्चन आदी कार्यक्रमांनंतर लग्नमंडपाच्या व्यासपीठावर ‘व्यंकट रमणा गोविंदा, गोविंदा गोविंदा’चा गजर करत तुला करण्यात आली. धान्य, नारळ, गायीचे तूप, तेल, तर कुणी सुट्या पैशांची तुला केली. राजकीय नेत्यांपासून आबालवृद्धांसह साधारणपणे ४० जणांनी यात सहभाग घेतला. तत्पूर्वी, तिरुपती देवस्थानातून आणलेल्या तराजूची महोत्सवाचे आयोजक, निमंत्रक भोईर, शिंदे आदींनी पूजा केली. त्यांनाच सपत्नीक तुलेचा सर्वप्रथम मान मिळाला. त्यानंतर, पत्नी आणि मुलीसह शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे आणि भोईर यांचे पुत्र सुमित भोईर यांनीही तुला केली. तेवढ्यात राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मंडपात आगमन झाले. लागलीच त्यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले. त्यांनी श्रीनिवासाचे दर्शन घेत ‘तुला’ करण्याआधी तराजूला वंदन केले आणि तुलेसाठी चव्हाण तराजूत बसले. तराजूत धान्याच्या गोण्या टाकण्यात आल्या. यामध्ये त्यांचे वजन सर्वाधिक भरल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश म्हात्रे यांनी जाहीर करताच सभामंडपात एकच जल्लोष झाला. अर्थात राज्यमंत्र्यांचे नेमके वजन किती भरले ते आयोजकांनी जाहीर केले नाही. महोत्सवाच्या आयोजक असलेल्या शिवसेनेच्या खासदार, आमदार यांनी केवळ नोंद घेतली. राज्यमंत्रीच ‘वजनदार’असल्याची खमंग चर्चा व्यासपीठावरच रंगली होती. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत युतीचे संकेत प्राप्त होत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत खासदारांच्या विजयाकरिता राज्यमंत्री आपले वजन कसे वापरतात आणि विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे पिता-पुत्र आपले वजन चव्हाण यांच्या पारड्यात टाकतात किंवा कसे हे लवकरच दिसणार आहे.
गेल्या काही वर्षांत राजकीय नेत्यांमध्ये वजन नियंत्रित ठेवण्याची चुरस पाहायला मिळते. त्याकरिता बहुतांश नेते हे जीममध्ये व्यायाम करतात. डाएटिशीयनच्या सल्ल्याने आहार घेतात तर काही राजकीय नेत्यांनी वाढते वजन रोखण्याकरिता बॅरिएट्रीक सर्जरी करुन घेतली आहे. एकेकाळी राजकीय मंडळी वय लपवत होती. हल्ली जॅकेट परिधान करुन वजनही लपवतात. मात्र तिरुपतीचरणी झालेल्या तुलेमुळे कल्याण-डोंबिवलीतील कुठला राजकीय नेता किती नारळात तोलला गेला आणि कुठली नगरसेविका किती गोणींची आहे हे गुपित उघड झाले.
>हास्य, फटकारे यांनी रंगला सोहळा
कोणकोणते राजकीय नेते तुला करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नाशिकचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनाही तुला करण्याकरिता शिवसेना महिला संघटक कविता गावंड यांनी आग्रह केला. मात्र चौधरी यांनी नकार दिला. अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या मागणीकरिता अलीकडेच उद्धव ठाकरे गेले होते. त्या दौऱ्याच्या आयोजनात खा. संजय राऊत यांचा मोठा वाटा होता.
भाऊसाहेब चौधरी हे राऊत यांचे निकटवर्तीय असल्याने तेही दीर्घकाळ अयोध्येत होते. त्यामुळे चौधरी यांचे अयोध्या दौºयाच्या आयोजनामुळे ‘वजन’ आधीच वाढल्याची टिप्पणी काहींनी केल्याने सर्वांच्याच चेहºयावर हसू उमटले. त्यावर, चौधरींनी हा टोला होता की, कौतुक असे विचारत हास्यकल्लोळात भाग घेतला.
महिलांमध्ये आमदार भोईर आणि शिंदे यांच्या पत्नीचीही तुला केली गेली. तसेच नगरसेविका भारती राजेश मोरे यांचीही तुला केली गेली. तुला सुरु असताना सभामंडपात हास्याचे कारंजे उडत होते अन जल्लोषाचे वातावरण होते.

Web Title: Eat Chavan's 'weighty' minister than Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.