टीव्हीसमोर बसून जेवल्याने अकारण जास्त जेवले जाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:27 AM2021-06-17T04:27:08+5:302021-06-17T04:27:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : अलिकडे पोटाचे विकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. टीव्ही पाहात जेवण केल्याचे विपरित परिणाम समोर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : अलिकडे पोटाचे विकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. टीव्ही पाहात जेवण केल्याचे विपरित परिणाम समोर येत असून, तज्ज्ञांनी या प्रकाराबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. गेल्या तीन वर्षांत आबालवृद्धांना पोटाचे विकार जास्त प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालकांनो टीव्हीसमोर बसून जेवत असाल तर सावधान. जास्तीचे अन्न पचत नाही. त्यामुळे पोटाचे विकार वाढतात. याविषयीच्या तक्रारी वाढत असून, पुढील पिढीसाठीही ते घातक असल्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
लहान मुलांचे पोट वाढलेले दिसणे, लठ्ठपणा असणे हे आता कौतुकाचे विषय वाटत असले तरीही ते भविष्यात चिंतेचे ठरु शकतात, मुलांना वेळीच चांगल्या सवयी लावा, फास्ट फूड, जंक फूड आणि थंड पदार्थ, अतिगोड, मलईयुक्त पदार्थ खायला देण्यापासून रोखावे, अन्यथा अनावश्यक अन्न पोटात जाऊन त्यामुळे चरबी निर्माण होत आहे. नको त्या वयातच मुलांच्या पोटाभोवती चरबीची गोल वळी पडत असून, ती सुदृढ आरोग्याची लक्षणं नाहीत, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.
--------------------------------
पोटविकाराची प्रमुख कारणे :
- पिझ्झा, बर्गर, पाव, जंक फूड खाणे
- चायनीज खाद्यपदार्थ, तिखट खाणे
- अवेळी जेवणे, व्यायाम न करणे
- सतत खात राहणे
- मॅगी, नुडल्स, मैदायुक्त पदार्थ खाणे
- चीज, बटर, पनीरचे, मलाईयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाणे
--------------------------
पोटविकार टाळायचे असतील तर :
- टीव्हीसमोर बसून जेवणे टाळा
- सकस आहार घ्या
- जास्त हॉटेलिंग टाळणे,
- व्यायाम करणे
- चालणे, भरपूर पाणी पिणे
- सर्व पदार्थ समप्रमाणात खाणे
- अतिथंड, जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न न खाणे
------------------
गृहिणींच्या प्रतिक्रिया
मुलांचे जेवणात मन लागत नाही. पालेभाज्या खात नाहीत. कोशिंबीर आवडते. पण त्यात सॉस टाकले तर खाल्ले जाते. अतिलठ्ठपणा, आळस येत असल्याने चिंता वाटते. सतत मॅगी, न्यूडल्स, चायनीज पदार्थ, पिझ्झा, वडापाव खायला मागतात. पोटाच्या तक्रारी वाढत आहेत, पण काय करावे सुचत नाही. : गृहिणी
--------
सतत गोड खाणे, मलाईयुक्त पदार्थ खाणे यामुळे मुलांची पचनशक्ती बिघडते. तीन, चार वेळा जाऊनही पोटात मुरड आल्यासारखे वाटते. हे प्रकार सतत वाढत आहेत. काहीही केले तरी समाधान नसते. सतत खाणे सुरू असल्याने पोटाचा घेर वाढत आहे. व्यायाम नसल्याने गॅस, अपचन होत असते. डॉक्टरकडे तरी किती वेळ जायचं? : गृहिणी
-------------
लहान असताना मुलांच्या खाण्याची काळजी घेतली. पण, आता मुले मोठी झाली. त्यांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या. घरचे अन्न नको असून चायनीज पदार्थ आवडतात. पिझ्झा, बर्गर आवडतो. रात्री अपरात्री खाल्ले जाते, काय करावे कळत नाही. : मोठ्या मुलांचे पालक
-----------------------
पोटविकार तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया
- अलीकडे पोटाच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत, हे गंभीर आहे. वेळीच मुलांनी, किंबहुना पालकांनी त्यांच्या जेवणाच्या सवयी बदला. टीव्हीसमोर बसून जेवू नका. अनावश्यक जेवले जाते. त्यामुळे नाहक अपचन होते. नको तेवढं अन्न पोटात साठवलं जात. त्याचा त्रास होतो आणि मग पोटाचे विकार सुरू होतात. या सगळ्यापासून वेळीच उपचार करून स्वतःत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे : डॉ राकेश पाटील, पोटविकार तज्ज्ञ
- पिरॅमिडच्या आकारासारखा आपला आहार असावा. सकाळच्या वेळेत जास्त प्रमाणात नाष्टा करावा, दुपारचे जेवण त्याहून कमी, संध्याकाळी आणखी कमी आणि रात्री अल्प प्रमाणात खावे ही सुदृढ, निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे. पण सध्या सगळं उलट सुरू असल्याने पोटाचे विकार वाढले आहेत. नागरिकांनी वेळीच सावध व्हावे आणि बदल करून निरोगी आरोग्य राखावे : डॉ. विनीत चौधरी, पोटविकार तज्ज्ञ.
- आजीचा बटवा फास्ट युगात मागे पडला. तस व्हायला नको, घरातील ज्येष्ठ मंडळी जे सांगतात. त्यानुसार आहार घ्यावा. जेवणात सगळे रस असावेत, म्हणजे गोड, कडू, तिखट, आंबट, तुरट, खारट या सगळ्या चवी असायला हव्यात. त्यामुळे आरोग्य राखण्यास मदत होते. कोणतीही गोष्ट अति केली की त्रास होणारच. हवामान, कुटुंबाची पद्धत यानुसारच अन्नपदार्थ सेवन करावेत, त्याचा त्रास होणार नाही. : डॉ. संजय चंदनानी, पोटविकार तज्ज्ञ.