टंडन रस्त्याला कोंडीचे ग्रहण
By admin | Published: April 10, 2017 05:32 AM2017-04-10T05:32:33+5:302017-04-10T05:32:33+5:30
बेकायदा रिक्षांवर कारवाई होत नसल्याने आधीच टीकेचे धनी धरलेल्या डोंबिवलीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा उग्र
डोंबिवली : बेकायदा रिक्षांवर कारवाई होत नसल्याने आधीच टीकेचे धनी धरलेल्या डोंबिवलीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा उग्र बनला आहे. पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या टंडन रस्त्यावर दिवसभरात तास-तासभर वाहतूक ठप्प होत असल्याने प्रवासी पुरते हैराण झाले आहेत.
आधी टंडन रस्त्याच्या काँक्रिटच्या कामामुळे राजेंद्रप्रसाद रोड, चिपळूणकर रस्ता, शिवमंदिर रोड, केळकर रोडवर वाहतूक कोंडी होत होती. ते काम पूर्ण होत असतानाच केळकर रोडवर काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे वळवलेल्या वाहतुकीचा फटका वाहनचालक आणि प्रवाशांना बसतो आहे.टंडन रस्ता, राजेंद्रप्रसाद रस्ता, चिपळूणकर पथ, शिवमंदिर रोड सतत गर्दीने कोंडलेले असतात. काही काळासाठी या ठिकाणी वाहतूक पोलीस असतात. (प्रतिनिधी)
भरवस्तीत कचराकुंड्या
कचराकुंड्यांमुळे रस्ते अडतात असे कारण देत टंडन रोडवरील कचराकुंड्या हटवण्यात आल्या. त्यातून मार्ग मोकळे केले. नागरिकांनी घंटागाड्यांनुसार आपल्या कचरा टाकण्याच्या वेळा बदलून घेतल्या. पण हॉटेलचालक, रेस्टॉरंट, चायनीज गाड्या यांच्यासाठी रात्री कचऱ्याची गाडी येत नसल्याने आणि तेही वेळेत कचरा टाकत नसल्याने सध्या त्यांनी टंडन रोडवर आणि राजेंद्रप्रसाद रोडवर ‘यशश्री’ इमारतीसमोर भरवस्तीत कचराकुंड्या तयार केल्या आहेत. तेथे कचरा उचलण्यासाठी गाड्या उभ्या राहतात आणि त्यामुळेही वाहतूक कोंडी होते.
दगडमातीचे ढिगारे
राजेंद्रप्रसाद रस्त्यावर जलवाहिनीच्या कामासाठी रस्ता खोदल्यानंतर मातीचे ढिगारे तसेच आहेत. काही ठिकाणी माती ढकलून दिल्याने वाहने गेल्यावर ती सतत उडत राहते. म्हाळगी चौकात दगडांचा ढिगारा तसाच ठेवण्यात आला आहे. याच चौकात काँक्रिटचा रस्ता आणि डांबरी रस्ता एका पातळीत न आणल्याने वाहने आदळत राहतात. त्यांचा वेग मंदावतो आणि कोंडी होत राहते.
गतिरोधकाची गरज
टंडन रोडवर पुसाळकर उद्यानात जाणारे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना वाहनांच्या गर्दीमुळे रस्ता ओलांडता येत नाही. बराचवेळ ताटकळत उभे रहावे लागते. शिवाय क्रांतीनगर झोपडपट्टीतील रहिवाशांची स्वच्छतागृहेही या उद्यानालगत आहेत. त्यामुळे तेथे गतीरोधकाची गरज आहे. त्यातून वाहतूक जरी मंदावली तरी संभाव्य अपघात टळू शकतील.
बेशिस्त वाहनचालक
या वाहतूक कोंडीत भर घालतात ते बेशिस्त रिक्षाचालक आणि कारचालक. काही मिनिटांसाठी जरी वाहतूक थांबली तरी वेगवेगळ््या दिशांतून, प्रसंगी फुटपाथवरून गाड्या घुसवून ते कोंडीत भर घालतात. त्यामुळो कोंडी लवकर न फुटता त्यात भर पडत राहते.
बेकायदा पार्किंग
डोंबिवलीतील प्रमुख रस्त्यांवर दुतर्फा बेकायदा पार्किंग आहे. शिवाय बेवारशी वाहनांची संख्याही मोठी आहे. त्यातच वाहन दुरूस्ती केंद्रे, ड्रायव्हिंग स्कूलच्या गाड्यांनीही रस्ते अडवलेले असतात. पण त्या वाहनांवर वाहतूक पोलीस किंवा ती टो करणारे कधीही कारवाई करत नसल्याने रस्ते अरूंद होतात आणि कोंडी वाढत राहते.