ठाणे जिल्हा परिषदेच्या राहनाळ शाळेत इकोफ्रेंडली धुळवड
By सुरेश लोखंडे | Published: March 23, 2024 05:24 PM2024-03-23T17:24:43+5:302024-03-23T17:26:22+5:30
सध्याच्या बदललेल्या वातावरणामध्ये नैसर्गिक आणि इकोफ्रेंडली होळी साजरी करणे ही काळाची गरज ठरत आहे.
सुरेश लोखंडे, ठाणे : सध्याच्या बदललेल्या वातावरणामध्ये नैसर्गिक आणि इकोफ्रेंडली होळी साजरी करणे ही काळाची गरज ठरत आहे. त्यास अनुसरून भिवंडी तालुक्यातील राहनाळ येथील जिल्हा परिषदे केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी इकोफ्रेंडली होळी व धुळवड साजरी करून आनंद साजरा करून गांवकऱ्यांना हाेळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.
होळी व धुळवड सणाच्यानिमित्ताने पारंपारिक होळी बरोबरच बीट, गाजर, झाडाची पान-फले आणि हळद यांच्यापासून नैसर्गिक रंग विद्याथ्यांनी तयार केले. आजूबाजूचा कचरा, शेणाच्या गोवऱ्या, कापूर, विद्यार्थ्यांच्या मनातील वाईट विचार नाहिसे करण्यासाठी होळीच्या भोवत लावलेल्या पताकांवर विद्यार्थ्यांनी मनातील नकारात्मकता लिहून त्यांची हाेळी केली. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थीनी सिद्धी पांडे व परी बिंद यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. यावेळी संध्या जगताप, रसिका पाटील यांनी होळीची पारंपरिक गीते गायली. होलीकेची कथा अंकुश ठाकरे यांनी सांगितली. यासाठी विद्यार्थ्यांना राजश्री पाटील, अनघा दळवी, चित्रा पाटील या शिक्षिकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. केंद्रप्रमुख शरद जाधव यांनी होळी सणाचा विज्ञानाशी असलेला संबंध उलगडून सांगितला. ग्रामपंचायत लिपिक विश्राम नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमिला कडू, सदस्य प्रतिभा नाईक, पालक तसेच विद्यार्थीं मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी होळीसाठी जिवंत झाड तोडू नये, पाण्याची बचत करावी, केमिकल मिश्रित रंग वापरू नये, प्लॅस्टिक पिशव्या आणि फुगे एकमेकांवर मारू नये असा सल्ला शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.