चेणे येथील लक्ष्मी नदीवर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या कामास इको सेन्सेटिव्ह झोन समितीची परवानगी
By धीरज परब | Updated: March 16, 2024 19:45 IST2024-03-16T19:45:27+5:302024-03-16T19:45:38+5:30
लक्ष्मी नदीवर वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट द्वारे सौंदर्यीकरण करून पर्यटनाचे केंद्र विकसित करावे यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी शासनाकडे चालवलेल्या पाठपुराव्या नंतर सदर प्रकल्पास व ५० कोटी निधीला सरकारने मान्यता दिली.

प्रातिनिधिक फोटो
मीरारोड - गुजरातच्या साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलमेंटच्या धर्तीवर घोडबंदर मार्गवरील चेणे येथील लक्ष्मी नदीवर रिव्हर वॉटरफ्रंट डेव्हलमेंटच्या कामास पर्यावरण संवेदनशील क्षेत्र सनियंत्रण समितीची परवानगी मिळाली आहे. ५० कोटींचा खर्च असलेल्या प्रकल्पाला याआधीच राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. यामुळे निसर्गाच्या कुशीत नदीचे सौंदर्यीकरण सह पर्यटनाला चालना मिळणार असून महाराष्ट्र राज्यातील हा पहिला रिव्हर डेव्हलपमेंट प्रकल्प ठरणार आहे.
लक्ष्मी नदीवर वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट द्वारे सौंदर्यीकरण करून पर्यटनाचे केंद्र विकसित करावे यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी शासनाकडे चालवलेल्या पाठपुराव्या नंतर सदर प्रकल्पास व ५० कोटी निधीला सरकारने मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपये निधी महापालिकेकडे वर्ग करण्याचा शासन निर्णय झाला.
महानगरपालिकेने वन विभागाकडे इकोसेन्सेटिव्ह झोनची परवानगी मागितली असता ठाणे वन विभागाच्या उप वनसंरक्षक यांनी महापालिकेला पत्र पाठवून समितीने परवानगी दिल्याचे कळवले. नदीचे सौंदर्यीकरण करण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया महापालिकेने आधीच केली आहे. इको सेन्सेटिव्ह झोनची परवानगी मिळाल्याने आता रिव्हर फ्रंट विकासाचे काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती आ. सरनाईक यांनी दिली.
नदी किनारा विकास असा होणार
नदीवर पावसाळ्यात अनेक जण निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी येतात. किनाऱ्यावर पायऱ्या बनवल्या जातील, पर्यटकांना फिरण्यासाठी , बसण्याची सोय असेल. आकर्षक लायटिंग, पर्यावरणाचा विचार करून गार्डन असे निसर्ग सुख पर्यटकांना अनुभवता येईल. लक्ष्मी नदी ठाणे आणि मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे हा रिव्हर फ्रंट विकसित झाल्यास मीरा भाईंदरच्याच नव्हे तर ठाणे, मुंबईच्या नागरिकांना देखील आनंद घेता येईल . चेणेच्या ह्या लक्ष्मी नदीच्या परिसरात पूर्वी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे शुटींग झाले आहे. पर्यटक वाढल्यास स्थानिक आदिवासी, आगरी व इतर भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे आ . सरनाईक यांनी सांगितले .