सार्वजनिक गणेशोत्सवही होतोय इकोफ्रेण्डली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 03:45 AM2017-08-19T03:45:37+5:302017-08-19T03:45:48+5:30
यंदा बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इकोफ्रेण्डली सजावटीवर भर देणार आहेत.
ठाणे : यंदा बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इकोफ्रेण्डली सजावटीवर भर देणार आहेत. काही शाडूच्या मूर्तींनाही पसंती देत आहेत. त्यामुळे घरगुती गणेशोत्सवाबरोबर सार्वजनिक गणेशोत्सवही यंदा इकोफ्रेण्डली होणार आहे. वेळेत सजावट पूर्ण करण्यासाठी मंडळाची लगीनघाई सुरू आहे.
ठाण्यात इकोफ्रेण्डली ही संकल्पना चांगलीच रुजली आहे. गणेशोत्सव आरास स्पर्धेत उतरणारी मंडळे हमखास इकोफ्रेण्डली सजावट करतात. यंदा बहुतांशी मंडळे हीच संकल्पना सजावटीच्या माध्यमातून राबवित आहे. कागद, लाकूड, कार्डबोर्डसारख्या साहित्यांचा वापर करीत आहेत. सोशल मीडिया ते सैनिकांपर्यंतचे विषय मंडळांकडून हाताळले जात आहेत. सजावटीबरोबर काही मंडळे शाडूच्या मातीच्या मुर्तीला पसंती देत आहेत. अवघ्या पाच दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. या धर्तीवर मंडळांची सजावटीच्या कामाची लगीनघाई सुरू आहे. बुधवारपर्यंत सजावट पूर्ण करण्याची डेडलाईन ठरविली आहे. जसा वेळ मिळेल तसे परिसरातील नागरिक मदतीसाठी येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
>सजावटीची तयारी आताच सुरू झाली आहे. यंदा आम्ही सोशल मीडिया आणि नातेसंबंध हा विषय हाताळत आहोत. पाच वर्षांपासून आम्ही थर्माकोलच्या सजावटीला बाजूला सारून केवळ कार्डबोर्ड आणि पेपरचा वापर करुन सजावट करीत आहोत. मूर्ती आधीपासूनच शाडूच्या मातीची आणतो.
- प्रमोद सावंत, अध्यक्ष,
श्रीरंग गणेशोत्सव मंडळ
देशी गायीचेच दूध वापरा असा संदेश यंदाच्या सजावटीमधून आम्ही देणार आहोत. ही सजावट पर्यावरणस्नेहीच असेल. मातीच्या मूर्तीला तडे जातात म्हणून आम्ही शाडूची मातीची मूर्ती आणणे बंद केले.
- जितू सावंत, सल्लागार,
श्री साईकृपा मित्र मंडळ