ईडी झाली येडी... ठाण्यात भाजप सरकार आणि ईडीचा प्रतीकात्मक पुतळा जाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 02:03 PM2019-09-25T14:03:37+5:302019-09-25T14:05:37+5:30
शरद पवार यांच्या केसांना जरी धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटेल असा इशारा ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
ठाणे - राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीच्या मार्फत गुन्हा दाखल झाल्यानंतर याचे तीव्र पडसाद ठाण्यात पडले असून पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी भारत सरकार आणि ईडीचा प्रतीकात्मक पुतळा जाळून भाजप सरकार, नरेंद्र मोदी आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यापुढे शरद पवार यांच्या केसांना जरी धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटेल असा इशारा ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
शरद पवार यांच्यासह अजित पवार आणि ७० लोकांवर ईडीमार्फत गुन्हा दाखल झाल्यानंतर बारामती,मुंबई तसेच महाराष्ट्राच्या विविध भागात या याचे पडसाद उमटायला सुरुवात झाले असून ठाण्यात शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांनी पाचपाखाडी येथील पक्ष कार्यालयाच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. मोदी यांचा हिटलर असा उल्लेख करून अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर ईडी झाली येडी अशी घोषणा करून ईडीची देखील खिल्ली उडवली. यावेळी भाजप सरकार आणि ईडीचा प्रतीकात्मक पुतळा देखील जाळण्यात आला. शरद पवार यांच्या या प्रकरणाशी काही संबंध नसताना पवार यांना या प्रकरणात राजकीय भावनेपोटी गोवण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शहर पवार यांना मिळत असलेला प्रतिसादामुळे भाजपची पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे जाणूनबुजून अशा प्रकारची कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप आनंद परांजपे यांनी यावेळी केला आहे.