मनसैनिकाची आत्महत्या; राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्यानं स्वत:ला पेटवलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 09:17 AM2019-08-21T09:17:52+5:302019-08-21T09:47:37+5:30
मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूर मील व्यवहार प्रकरणी ईडीने नोटीस पाठवल्याने मनसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
ठाणे - मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूर मील व्यवहार प्रकरणी ईडीने नोटीस पाठवल्याने मनसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, राज ठाकरेंना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याने आलेल्या मानसिक तणावामधून ठाण्यात एका मनसैनिकाने पेटवून घेत आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. प्रवीण चौगुले असे या आत्महत्या करणाऱ्या मनसैनिकाचे नाव आहे.
प्रवीण चौगुले हा ठाण्यातील विटावा परिसरात राहणारा होता. दरम्यान, राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर प्रवीणने ईडीविरोधात सोशल मीडियावर अनेक पोस्ट लिहिल्या होत्या. यासंदर्भात लोकमतने मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, ''राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्याने आपण टेन्शनमध्ये असल्याचे प्रवीणने आपल्या निकटच्या मित्रांना सांगितले होते. तसेच त्याविरोधात टोकाचे पाऊल उचलणार असल्याचेही तो म्हणाला होता. मात्र मित्रांनी त्याला असे न करण्याचा सल्ला दिला होता. पण मंगळवारी रात्री प्रवीण याने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली.''
प्रवीण चौगुले याने राज ठाकरे यांना मिळालेल्या ईडीच्या नोटिशीला विरोध म्हणून आत्महत्या केल्याचा दावा मनसैनिकांकडून करण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी अद्याप त्याला दुजोरा दिलेला नाही. प्रवीणच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. अधिक तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
प्रवीण याने मंगळवारी ईडीविरोधात लिहिलेली फेसबूक पोस्ट
दरम्यान, ठाण्यातील मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी घटनेची माहिती मिळताच, कळव्यातील रुग्णालयात धाव घेतली. ''ज्यावेळी मला समजलं तसं मी इकडे धावत आलो, तो 85 टक्के भाजला आहे. मी त्याच्या मित्रांशी बोललो, त्यावेळी राज ठाकरेंच्या ईडीप्रकरणामुळे माझी घुसमट होत असल्याचे त्याने म्हटले होते आज दिवसभर तो, याच विचारात होता. हा प्रकार जर याच घटनेमुळे घडला असेल तर, ही खेदाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील सर्व मनसैनिकांना, राज ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला मी सांगेन की, कुणीही असं कुठलंही कृत्य करू नका. राज ठाकरेंना हे कृत्य कधीही आवडणार नाही. ते या कृत्याला कधीही दुजोरा देणार नाहीत. त्यामुळे कुणीही असे कृत्य करू नये,'' असे आवाहन ठाणे अविनाश जाधव यांनी केलं आहे.
पक्षाच्या ‘यू-टर्न’मुळे मनसैनिक संभ्रमात; ईडीच्या कार्यालयाकडे फिरकू नका - राज ठाकरे
पी. चिदम्बरम अडचणीत; कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटकेची शक्यता
श्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या!
बारामुला चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, एक जवान शहीद
२९, ३०, ३१ ऑगस्टला भरतीमुळे मुंबापुरीची तुंबापुरी होण्याची भीती