उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला ब्लॅकमेलिंग प्रकरणी अनिल जयसिंगानीच्या घराची ईडी कडून झाडाझडती
By सदानंद नाईक | Published: May 9, 2023 08:24 PM2023-05-09T20:24:10+5:302023-05-09T20:24:32+5:30
उल्हासनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला १ कोटींची लाचेचे आमिष दाखवून ब्लॅकमेलिंग प्रकरणी गुजरात ईडीच्या ...
उल्हासनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला १ कोटींची लाचेचे आमिष दाखवून ब्लॅकमेलिंग प्रकरणी गुजरात ईडीच्या पथकाने दुपारी शहरातील अनिल जयसिंगांनी यांच्या घराची झाडाझडती घेऊन घरावर नोटिस चिटकून दिली. याबाबत पथकाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारां सोबत काहीएक बोलण्यास नकार देऊन कारवाईचे संकेत दिले.
उल्हासनगरातील माजी नगरसेवक व क्रिकेट बुक्की अनिल जयसिंगांनी यांच्या अनिष्का नावाच्या मुलीने उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना मॉडेलिंग असल्याचे भासवून मैत्री करण्याचा प्रयत्न केला. यातूनच १ कोटीच्या लाचेचे आमिष दाखवून ब्लॅकमेलिंग केल्या प्रकरणी अनिष्का व अनिल जयसिंगांनी यांच्या विरोधात मुंबई येथे गुन्हा दाखल झाला. मुंबई पोलिसांनी अनिष्काला उल्हासनगरातील राहत्या घरातून अटक केल्यानंतर, काही दिवसातच गुजरात मधून अनेक वर्षापासून विविध गुन्हयात फरार असलेल्या अनिल जयसिंगांनी यालाही अटक केली. पोलीस चौकशीत मोठा घोळ आढळल्याने, ईडीची कारवाई सुरू झाली.
उल्हासनगर कॅम्प नं-१ येथील अनिल जयसिंगानी यांच्या घरी मंगळवारी दुपारी गुजरात ईडी पथकासह इतर विभाग पथक दाखल झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. ईडीच्या घर झडती बाबत व चौकशी बाबत ईडीच्या पथकाने कोणतीही माहिती पत्रकारांना दिली नाही. पथकाने घराची झाडाझडती घेतल्यानंतर, घराच्या दरवाज्यावर एक नोटीस चिपकविण्यात आली. ईडीच्या कारवाईने, शहरातील वातावरण ढवळून निघाले. अनिल जयसिंगांनी यांचे घर उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते.
याबाबत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या सोबत संपर्क केला असता, त्यांनी धाडी बाबत आम्हाला काहीएक कल्पना दिली नसल्याचे सांगितले. मात्र अनिल जयसिंगांनी यांच्या इमारती खाली ईडी पथकासह अन्य पथकाच्या गाड्या उभ्या असल्याची माहिती मिळाल्याचे फुलपगारे म्हणाले. शहरात ईडीच्या झाडाझडतीची चर्चा सुरू असून नागरिकांकडून विविध तर्कवितर्क केले जात आहे.