कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर खाद्यतेलाच्या किमतीत घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:26 AM2021-06-22T04:26:30+5:302021-06-22T04:26:30+5:30
मुरलीधर भवार लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. मागच्यावर्षी वाढलेले खाद्यतेलाचे भाव ...
मुरलीधर भवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. मागच्यावर्षी वाढलेले खाद्यतेलाचे भाव जुलैपर्यंत आणखी वाढतील, असा अंदाज बाजारातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात होता. मात्र जूनमध्ये भाव कमी झाल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
खाद्यतेलात शेंगदाणा तेलाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. आता खाद्यतेलाचे दर कमी झाले असले तरी, अन्य तेलाच्या तुलनेत शेंगदाणा तेलाचे दर स्थिर आहेत. सूर्यफूल, सोयाबीन, पाम आणि राइस ब्रॅन या तेलाच्या किमती वाढल्या होत्या. त्यातही राईचे तेल हे सगळ्य़ात जास्त महाग होते. त्याचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात उत्तर भारतीय करतात. महाराष्ट्रीय लोक शेंगदाणा तेलाला आधी प्राधान्य देतात. अन्य सूर्यफूल, राइस ब्रॅन यांना नंतरचे प्राधान्य आहे. मध्यमवर्गीय ग्राहक सोडला, तर सगळीकडे रिफाइंड तेल खाण्यावर जास्त भर असतो. त्यातही सामान्यांची पसंती ही पाम तेलाला अधिक असते.
कोरोना काळात अन्नधान्याच्या पाकिटांचे वाटप सामाजिक संस्था व राजकीय पक्षांकडून केले गेले. त्यात पाम तेलाचे एक ते दोन लिटरचे पॅकेट जास्त खरेदी करून दिले गेले. त्यामुळे पाम तेलाची विक्री जास्त झाली होती. कोरोना काळात नागरिकांच्या हातचे काम गेले. अनेकांना पगार कपात सहन करावी लागली. त्यामुळे सरकारने जीवनाश्यवक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले पाहिजेत, अशी माफक अपेक्षा होती. कोरोना काळात जीवनाश्यक वस्तूंचे भाव वाढले. त्यात खाद्यतेलही महागले होते. त्यामुळे महिलांचे घरचे बजेट कोलमडले होते. खाद्यतेलावरील कर कमी केल्याने आता कुठे किमती घसरल्या आहेत. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे. मात्र कमी झालेले भाव यापुढेही स्थिर राहावेत, अशी माफक अपेक्षा महिला वर्गाकडून केली जात आहे.
-------------------------
गृहिणींना मिळाला थोडासा दिलासा
कोरोना काळात तेलाला भाववाढीची चांगलीच फोडणी बसली होती. त्यामुळे आमच्या घरातील तेलाचे बजेट कोलमडले होते. त्यामुळे तेल वापरताना हात आखडता घेतला जात होता. आता तेलाचे भाव कमी झाल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, पुन्हा तेलाचे भाव वाढविले जाऊ नयेत, अशी अपेक्षा नागरिक सरकारकडून व्यक्त करत आहेत.
---------------------
शेतकरी प्रतिक्रिया...
१. आमची नाशिकला भुईमुगाची शेती आहे. शेतातील भुईमूग सुकवून त्यानंतर त्यातील दाणे काढून शेंगदाणा तेलासाठी त्याचा उपयोग करतो. मात्र शेंगदाणा तेलाचे दर स्थिर आहेत. त्यामुळे या भाववाढीचा आणि भाव कमी केल्याचा आम्हाला काहीएक फायदा झाला नाही.
- सुरेश निचळ
२. आम्ही सूर्यफुलाचे पीक घेतो. त्याच्या बियांपासून तेल तयार केले जाते. मागच्यावर्षी कोरोना काळात सूर्यफुलाच्या तेलाचे भाव वाढले होते. ते जुलैमध्येही वाढतील, अशी अपेक्षा होती. पण आता कमी झाल्याने आमच्या पदरी पुन्हा कमीच पैसे मिळणार आहेत.
- दाजीबा सोपान
---------------------------
प्रति लिटर तेलाचे आताचे दर...
सूर्यफूल - १५५ रुपये
सोयाबीन - १३५ रुपये
शेंगदाणा - १६५ रुपये
पाम - ११५ रुपये
राइसब्रॅन - १५५ रुपये
---------------------
याआधीचे दर...
सूर्यफूल - १७५ रुपये
सोयाबीन - १५९ रुपये
शेंगदाणा - १६० रुपये
पाम-१३५ रुपये
राइसब्रॅन-१८० रुपये
----------------------