मौज प्रकाशन गृहचे संपादक-प्रकाशक संजय भागवत यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 10:01 PM2019-02-03T22:01:15+5:302019-02-03T22:13:38+5:30
मौज प्रकाशन गृहचे संपादक - प्रकाशक संजय भागवत यांचे रविवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. विलेपार्ले येथील पारशीवाडा स्मशानभूमीमध्ये सोमवारी सकाळी ११.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ठाणे: मुंबईतील मौज प्रकाशन गृहचे संपादक - प्रकाशक संजय भागवत यांचे रविवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी भाग्यश्री, मानसोपचार तज्ज्ञ मुलगी मनवा, मॅनेंजमेंटचे शिक्षण घेणारा मुलगा अनिरुद्ध आणि मोठे भाऊ श्रीकांत असा परिवार आहे.
अनेक नामांकित पुस्तकांचे प्रकाशन करणारी संस्था म्हणून मौज प्रकाशनची ओळख आहे. या प्रकाशन गृहाचे माजी संपादक तथा प्रकाशक श्रीकृष्ण भागवत यांच्या निवृत्तीनंतर १९९७ पासून ते २०१५ पर्यंत संजय भागवत यांनी प्रकाशक म्हणून मौजची धूरा सांभाळली. १९९७ आधी ते मौजच्या प्रिटींग विभागात काम करीत होते. २०१५ मध्ये पक्षाघाताचा झटका आल्याने त्यांच्यावर अंधेरीमधील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच रुग्णालयाच्या ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील एका युनिट मध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. रविवारी सकाळी १०.३० वा. च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.उत्कृष्ट प्रकाशकासाठी देण्यात येणाऱ्या श्री. पु. भागवत या राज्य पुरस्काराने महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला आहे. श्री. पु. भागवतांपासूनची उत्कृष्ठ लेखन सामग्रीच्या प्रकाशनाची परंपरा त्यांनी राखली होती.त्यांच्यावर विलेपार्ले पूर्व येथील सहार रोडवरील पारशीवाडा स्मशानभूमीमध्ये सोमवारी सकाळी ११.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांचे थोरले बंधू श्रीकांत भागवत यांनी ‘लोकमत’ला दिली.