सुशिक्षित मतदारांना पडली नरेंद्र मोदींची भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:21 PM2019-05-27T23:21:15+5:302019-05-27T23:21:18+5:30

अनेक अडचणींना तोंड देणारे कपिल पाटील यांना शहापूर विधानसभेत मोठी अडचण निर्माण होऊन सुरेश टावरे हे अधिक आघाडी घेतील, असे वाटत होते.

Educated voters fall prey to Narendra Modi | सुशिक्षित मतदारांना पडली नरेंद्र मोदींची भुरळ

सुशिक्षित मतदारांना पडली नरेंद्र मोदींची भुरळ

Next

- जर्नादन भेरे
लोकसभेसाठी मतदान झाल्यापासून अनेक अंदाज बांधले जात होते. अनेक अडचणींना तोंड देणारे कपिल पाटील यांना शहापूर विधानसभेत मोठी अडचण निर्माण होऊन सुरेश टावरे हे अधिक आघाडी घेतील, असे वाटत होते. शहापूर येथे झालेल्या जाहीर सभेत त्याचे पडसाद उमटले होते. मात्र, या सर्वांना एकत्र करून घेण्यात पाटील यांना यश आले म्हणण्यापेक्षा शिवसेनेची मते फिरली नाहीत. तब्बल १४ हजार ३२७ मताधिक्य पाटील यांना येथून मिळाले. मागील लोकसभा निवडणुकीत इतके मताधिक्य मिळाले नव्हते. तालुक्यातील सुशिक्षित मतदारांना मोदींनी भुरळ घातल्याने त्याचा फायदा पाटील यांना झाला.
या विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यांनी अनेक विकासकामे आणूनही मोदीलाटेने सर्वांवर पाणी फिरल्याने आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीची ठरणार आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात शहापूर विधानसभेत मिळणारी मते निर्णायक ठरणार होती. शहापूर विधानसभा मतदारसंघातील सर्वच जिल्हा परिषद गटांमध्ये पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली होती. त्यामुळे विधानसभेसाठी भाजपची भूमिका महत्त्वाची ठरवणार आहे.
पुढे येणाऱ्या विधानसभेसाठी शहापूर विधानसभेत खरी लढत ही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच होणार आहे. या क्षेत्रात काँग्रेस पक्षाची ताकद जरी नसली, तरी जी आहे ती तितक्याच ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर उभी राहील, असे वाटत नाही. कारण, आपल्याला त्यांची मदत झालीच नाही, असाही काँग्रेसमध्ये एक मतप्रवाह निर्माण झाला आहे.
शहापूर विधानसभेत विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा असून ते पाच हजार ५४४ मते मिळवून निवडून आले होते. तर, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पाटील केवळ तीन हजार इतकीच आघाडी या मतदारसंघात घेऊ शकले होते.
>की फॅक्टर काय ठरला ?
कपिल पाटील यांनी निवडणूक जाहीर होताच प्रचार करताना गावागावांतील कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यावर भर दिला. सुरेश टावरे यांना वेळच कमी मिळाला आहे. कपिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गावागावांतील मतदारांवर लक्ष केंद्रित केले. टावरे यांचे ठरावीक कार्यकर्ते वगळता इतर फारसे फिरकताना दिसले नाहीत.भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदानाच्या आदल्या दिवसापासून गाव सांभाळले, तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपली कामे सांभाळत राहिले.

Web Title: Educated voters fall prey to Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.