उल्हासनगर महापालिका शाळेत शिक्षण परिषद संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 07:26 PM2022-04-15T19:26:57+5:302022-04-15T19:27:38+5:30
महापालिका शाळा क्रं-१२ ४ तसेच शाळा क्रं-२४ मध्ये संपन्न झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका समग्र शिक्षा व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ठाणे यांच्या विद्यमनाने १२ व १३ एप्रिल रोजी महापालिका शाळेच्या केंद्रसमन्वयक, मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण परिषदेचे आयोजन केले होते. महापालिका शाळा क्रं-१२ ४ तसेच शाळा क्रं-२४ मध्ये संपन्न झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.
उल्हासनगर महापालिका शाळेत आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेला उपायुक्त सुभाष जाधव, अधिव्याख्याता डॉ संजय वाघ, प्रशासन अधिकारी भाऊराव मोहिते, लेखाधिकारी नीलम कदम आदीजन उपस्थित होते. यावेळी प्रशासन अधिकारी मोहिते यांनी शिक्षण विभागात सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. तर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी शिक्षण परिषदेचे महत्व व २१ व्या शतकातील शिक्षणात कोणते बदल अपेक्षित आहेत, मनपा शाळांचा पट कसा वाढेल आदी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
महापालिका शाळेत आयोजित केलेल्या समग्र शिक्षण परिषदेत शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी कला, कार्यानुभवासी निगडित साहित्य व खाद्य पदार्थांचे विविध स्टॉल मांडण्यात आले. या स्टॉलचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करून विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचा अनुभव देण्यात आला. तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांनी नृत्य कलेचे व नाटक कलेचे सादरीकरण केले. तर दुपारच्या सत्रात आदर्श पाठांचे नियोजन करण्यात आले. पपेट व मुखवट्यांचा अध्यापनात कसा वापर करता येईल. यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन आदर्श पाठ घेण्यात आले.