शिक्षण महत्त्वाचेच, पण मुलांच्या जीवापेक्षा नक्कीच नाही; पालक, शिक्षक, व्यवस्थापकांमध्ये चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 01:39 AM2020-05-27T01:39:56+5:302020-05-27T06:41:09+5:30
सगळेच म्हणतात, थोडं थांबायला हवं, तूर्तास आॅनलाइन शिक्षणच योग्य
- स्रेहा पावसकर/ जान्हवी मोर्ये ।
ठाणे/डोंबिवली : जिथे शाळा सुरू करणं शक्य नाही, ते भाग वगळता अन्य ठिकाणी १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय सोमवारी सायंकाळी शासनाने जाहीर केला आणि असंख्य पालकांच्या चिंतेत भर पडली. शिक्षण हे मुलांसाठी महत्त्वाचे आहेच, पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात मुलांच्या आरोग्यापेक्षा, त्यांच्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही, असा एकमुखी सूर सर्वच पालकवर्गातून आळवला जात आहे.
विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शाळा सुरू करण्याचा हा निर्णय घेतल्याचे शिक्षण आयुक्तांनी सांगितले. यात वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब केला जाणार आहे. ठाण्या-मुंबईतील शाळा कदाचित सुरू होणारही नाहीत, मात्र ज्या ठिकाणच्या शाळा सुरू होतील, त्या ग्रीन झोनमध्ये असून उपयोग नाही. एकूणच शाळा सुरू करणे म्हणजे विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचे मत पालकवर्गातून व्यक्त होत आहे. शाळा सुरू कधी होणार हा प्रश्न सर्वांनाच होता, मात्र अशा प्रकारे कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही शाळेबाबतच्या घेतलेल्या या निर्णयावर पालकांसह सर्वच स्तरांतून नाराजी व्यक्त होत आहे.
मुले सध्या पूर्णवेळ घरात आहेत. शाळा सुरू झाल्यावर ते मित्र-मैत्रिणींबरोबर जास्त मस्ती करतील. त्यामुळे सामाजिक अंतर राखले जाणार नाही. पाण्याची बॉटल, जेवणाचा डबा या सर्वांचे निर्जंतुकीकरण शक्य नाही. शिक्षक किती काळजी घेणार? कोरोना हा जीवावर बेतणारा रोग आहे. त्यामुळे सध्या शाळा नकोच.
- शीतल पाटील, पालक, डोंबिवली
ग्रीन झोनमधील शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ठाण्यातील शाळा कदाचित सुरू होणार नाहीत. ज्या ठिकाणच्या शाळा सुरू होतील, तो भाग ग्रीन झोनमध्ये असेल. परंतु त्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक राहतात, ते ठिकाण रेड झोनमध्ये येत असेल, तर ते शाळेत पोहोचू शकणार नाहीत. तसेच विद्यार्थी शाळेत आल्यावर सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर हे सगळं करू शकणार नाहीत. शिक्षक तरी प्रत्येक वेळी त्यांच्यावर किती लक्ष ठेवणार, हाही प्रश्नच आहे.
मुळातच इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील वर्गात प्रवेश दिला जातो. मग शाळा १५ जूनलाच सुरू करण्याचा हा निर्णय कशासाठी? आणखी काही महिने तर शाळा सुरू करण्याची वाट पाहू शकतो. त्यापेक्षा मुलांना शक्य असेल तेवढे आॅनलाइन शिक्षण द्यावे. प्रत्येक पालकाला आपले मूल महत्त्वाचे आहे. ते शाळेत येण्याबाबत धोका पत्करायला तयार नाहीत.
- डॉ. राज परब, संस्थापक, व्यवस्थापक, संकल्प इंग्लिश स्कूल, ठाणे
सध्या उन्हाळ्यातही कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. १५ जूनपर्यंत पाऊस येईल, तेव्हा प्रमाण वाढेल. मुलं शाळेत येतील, पण शाळेत आल्यावर मस्ती केल्याशिवाय, खेळल्याशिवाय एकत्र डबा खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंंग कसे पाळणार? शाळेतील अनेक मुलं विविध ठिकाणाहून प्रवास करत येणार, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचे काय? आणि मुळातच मोठी माणसं सोशल डिस्टन्स पाळत नाहीत, तर मुलांकडून कसली अपेक्षा करावी? एक-दोन महिने अंदाज घेऊन मग शाळा सुरू केली तर हरकत नाही.
- साधना जोशी, शिक्षिका, बेडेकर विद्यामंदिर, ठाणे
सोशल डिस्टन्स म्हणजे काय हे मुलांना कळत असले तरी शेकडो, हजारो विद्यार्थ्यांमध्ये ते ठेवले जाणार नाही. कुठला विद्यार्थी कुठून येतो, कसा प्रवास करतो याची कल्पना नसते. मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व आहे, पण कोरोनामुळे आम्ही शाळा सुरू झाल्या तरी मुलांना पाठवणार नाही.
- रूपाली शिंदे, पालक, ठाणे
गेले दोन महिने आम्ही अगदी खेळायलाही बाहेर पडलेलो नाही. त्यामुळे घरातून बाहेर पडावंसं तर वाटतं, शाळेत जायला खूप आवडतं आणि इच्छा पण आहे. पण मास्क घालून जावं लागेल, खूप भीती वाटते.
- सई डिंगणकर, विद्यार्थिनी, सरस्वती सेकंडरी स्कूल, ठाणे
शाळांनी योग्य ती काळजी घेतल्यास शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही. आम्ही याबाबत संपूर्ण तयारी केली असून शासनाच्या धोरणाची प्रतीक्षा आहे. शाळेत मुलांच्या आरोग्य सुरक्षेविषयी संपूर्ण काळजी घेण्यात येईल. शाळेच्या बसपर्यंत मुलांना सोडेपर्यंत पालकांनी काळजी घ्यायची आहे. डिजिटल शिक्षण पर्याय असला तरी त्याला मर्यादा आहेत. तसेच कॉम्प्युटर, मोबाइल बिघडल्यास दुरुस्त करणारी दुकानेही बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते.
- विवेक पंडित, संस्थापक, विद्यानिकेतन शाळा, डोंबिवली
सध्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सध्या डिजिटल शिक्षणच योग्य पर्याय आहे. ग्रीन झोन असलेल्या ठिकाणीही शाळा घाईने सुरू करू नयेत. चॅनेल किंवा केबलद्वारे शाळा सुरू कराव्यात. एप्रिलमध्ये आॅनलाइन शाळा सुरू असल्याने मुलांना त्याची सवयही झाली आहे. - लीना मॅथ्यू,
उपमुख्याध्यापिका, टिळकनगर शाळा, डोंबिवली
सध्या मुलांच्या शैक्षणिक वर्षापेक्षा आरोग्याची काळजी महत्त्वाची आहे. प्राथमिक विभागातील मुले लहान आहेत. त्यामुळे सामाजिक अंतराबाबत शिक्षकांनी लक्ष ठेवले तरी या मुलांना आवरणे कठीणच आहे. त्यामुळे सध्या तरी शाळा नकोच. डिजिटल माध्यमातूनच मुलांना शिकू द्या. त्याबद्दल हरकत नाही. - पिंकी गाला, पालक, डोंबिवली