शिक्षणमंत्री,ं कुलगुरूंविरोधात निदर्शने
By admin | Published: July 7, 2017 06:12 AM2017-07-07T06:12:59+5:302017-07-07T06:12:59+5:30
मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांचे निकाल रखडल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांचे निकाल रखडल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी गुरुवारी बिर्ला कॉलेजबाहेर हे आंदोलन केले. या वेळी कुलगुरू संजय देशमुख व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ््याचे दहन करण्यात आले.
विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक दर्शन बाबरे, पदाधिकारी सतीश चव्हाण, तुषार शेलार, सुशांत शेलार, मिहिर देसाई व विद्याथी त्यात सहभागी झाले. या वेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासन, देशमुख व तावडे यांच्याविरोधात घोषणा दिल्या.
देसाई यांनी सांगितले की, ‘बीए, बीएस्सी, बीकॉम याच्या परीक्षा एप्रिल-मेमध्ये झाल्या. विद्यापीठाच्या नियमानुसार, निकाल ३० दिवसांत जाहीर करणे आवश्यक आहे. काही कारणास्तव विलंब झाल्यास आणखी १५ दिवसांची मुभा आहे. यंदाच्या वर्षी प्रत्येक विद्यार्थ्याचा पेपर स्कॅन करून तो तपासण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे त्यात दिरंगाई झालेली आहे. आतापर्यंत २० टक्केच पेपर तपासून झाले आहेत. परीक्षेचा निकाल लागला नसला तरी एमए, एमकॉम, एमएस्सीची प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाने सुरू केली आहे. निकाल लागला आणि प्रवेश घेणारा विद्यार्थी नापास झाला तर त्याला प्रवेश दिला जाणार नाही. त्याचा प्रवेश अर्ज आपोआपच बाद होणार आहे. मात्र प्रवेशासाठी भरलेले शुल्क त्याला परत मिळणार नाही. निकालास उशीर झाल्याने त्याचा फटका विद्यार्थ्याना बसला आहे. प्रवेशाला विलंब झाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षात गॅप पडणार आहे.’