बलात्काराच्या तीन घटनांत शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 03:10 AM2018-05-26T03:10:52+5:302018-05-26T03:10:52+5:30
ठाण्यातील ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या घटनेमधील आरोपी गृहरक्षक दलाचा जवान आहे.
ठाणे : बलात्काराच्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन आरोपींना ठाणे न्यायालयाने शुक्रवारी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्यापैकी एक घटना ठाण्याची, एक मुंब्य्राची तर एक नवी मुंबईची आहे.
ठाण्यातील ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या घटनेमधील आरोपी गृहरक्षक दलाचा जवान आहे. आरोपीचे नाव जयपाल गोविंद परदेशी (४५) असून तो नवीन पोलीस वसाहतीचा रहिवासी आहे. आरोपीची पत्नी ठाणे पोलीस दलात पोलीस शिपाई आहे. आॅक्टोबर २०१५ मध्ये त्यांच्याकडे घरकामाला १४ वर्षांची मुलगी होती. आरोपीच्या लहान मुलीला सांभाळण्याचे काम ती करायची. २४ आॅक्टोबर २०१५ रोजी पत्नी घरी नसताना आरोपीने पीडित मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केला. २६ आॅक्टोबर २०१५ रोजी आरोपीने पुन्हा असाच घृणास्पद प्रकार केला. पीडित मुलीने हा प्रकार आरोपीच्या पत्नीला सांगितला; मात्र तिने दुर्लक्ष केले.
पीडित मुलीने हा प्रकार तिच्या मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीने तिच्या आईला याबाबत सांगितले. आईने २७ आॅक्टोबर २०१५ रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मुलीवर अत्याचार झाल्याचे या अहवालातून निष्पन्न झाले. सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदांडे यांनी या प्रकरणाचा तपास केला.
गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला लगेच अटक केली. तेव्हापासून आजतागायत आरोपी तुरुंगात आहे. मध्यंतरी, ठाणे न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयानेही आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. न्या. ए.एस. भैसारे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी याप्रकरणी १० साक्षीदार तपासले. उपलब्ध साक्षी, पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी जयपाल परदेशी याला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
मुलीच्या साक्षीमुळे पित्याला तुरुंगवास
पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यास ठाणे न्यायालयाने शुक्रवारी सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. चार वर्षांपूर्वी मुंब्रा येथे ही घटना घडली होती.पीडित मुलगी मुंब्य्रातील रेतीबंदर येथील गुजराती कॉलनीमध्ये वास्तव्यास असून संतोष शिवराम जाधव (५०) हे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. तो शाळेमध्ये जेवणाचे डबे पुरवण्याचे काम करायचा. त्याला १४ वर्षांची मुलगी आहे. रात्रीच्या वेळी तो मुलीवर लैंगिक अत्याचार करायचा.
पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितला. तिच्या आईने हा किळसवाणा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपीने दोघींना मारहाण करून मुलीचा छळ सुरूच ठेवला. जुलै ते डिसेंबर २०१४ पर्यंत मुलीने हा छळ सहन केला. अखेर, मुलीच्या आईने मुंब्रा पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार दिली. जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी या प्रकरणामध्ये सरकारी पक्षाची बाजू मांडली. पीडित मुलगी शेवटपर्यंत तिच्या साक्षीवर ठाम होती. उपलब्ध पुरावे आणि साक्षी जबाब ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी संतोष जाधव याला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
युवकाला १० वर्षे कारावासाची शिक्षा
गरीब अल्पवयीन मुलीला उत्तर प्रदेशात नेऊन तिच्यावर अत्याचार करणाºया एका युवकाला ठाण्याच्या द्रुतगती न्यायालयाने शुक्रवारी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. १३ वर्षांची पीडित मुलगी राजस्थानची असून ती दिवाळी आणि नववर्षाच्या वेळी कुटुंबीयांसोबत फुगे विकण्यासाठी नवी मुंबईला यायची. सीबीडी-बेलापूर येथील उड्डाणपुलाजवळ फुगे विकत असताना, तिथेच उसाच्या रसाची गाडी लावणारा आरोपी अजय ऊर्फ गेदाराम गौतम (२०) हा तिच्यावर लक्ष ठेवायचा.
३१ डिसेंबर २०१७ रोजी आरोपी अजयने या मुलीला फूस लावून उत्तर प्रदेशातील करोंदा या त्याच्या गावी पळवून नेले. तिथे एका खोलीमध्ये डांबून जवळपास १५ दिवस त्याने मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या आजोबांनी शोधाशोध सुरू केली. आरोपीची आपल्या नातीवर वाईट नजर असल्याचा संशय आजोबांना होता. त्यांनी ४ जानेवारी २०१८ रोजी सीबीडी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन मुलीची सुटका केली.
जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी पाच साक्षीदार तपासले. द्रुतगती न्यायालयाचे न्या. व्ही.बी. गव्हाणे यांच्यासमोर ही सुनावली झाली. पीडित मुलीवर आरोपीने अत्याचार केल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले. हा अहवाल आणि उपलब्ध साक्षी पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीस १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.