आदिवासी मुलांचा शिक्षणाचा मार्ग सुखकर; ठाकूरपाड्यात सायकलींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:40 AM2019-11-01T00:40:39+5:302019-11-01T00:41:04+5:30
टीम परिवर्तन, ‘युवा संस्कार’चा उपक्रम
डोंबिवली : टीम परिवर्तन या युवा गटाने युवा संस्कार बहुद्देशीय संस्थेच्या मदतीने कल्याण तालुक्यातील गोवेली येथील ठाकूरपाडा या आदिवासी पाड्यावरील मुलांना सायकलींचे वाटप केले. त्यामुळे आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा मार्ग सुखकर होणार आहे.
नागरिकांकडून जमा झालेले शैक्षणिक साहित्य, कपडे आणि घरगुती उपयोगी साहित्याचे वाटप टीम परिवर्तन या युवकांच्या गटाद्वारे सातत्याने आदिवासी पाड्यांवर केले जाते. तसेच ग्रंथालय उभारणीही केली जात आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ठाकूरपाडा येथील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी पायपीट थांबावी, यासाठी गरजू मुलांना एकूण १२ सायकलींचे यावेळी वाटप करण्यात आले. ठाणे येथील सूर्या आणि प्रभात सोसायटीच्या सदस्यांनी आपल्या सोसायटीतील नादुरुस्त सायकली टीम परिवर्तनाला दिल्या आहेत. रूपाली देशमुख यांनी त्यासाठी विशेष मदत केली. सकल आदिवासी संस्थेच्या महिलांनी सायकलींची दुरुस्ती करण्यासाठी आर्थिक मदत केली.
दरम्यान, सायकलींचे वाटप करताना ‘युवा संस्कार’चे सोमनाथ राऊत, ‘टीम परिवर्तन’चे कार्यकर्ते अनिकेत बारापात्रे, नामदेव येडगे, संकेत जाधव, त्रिलोचन परब, तुषार वारंग यावेळी उपस्थित होते. वंचित घटकांसाठी सुरू असलेल्या शैक्षणिक साहित्य संकलन त्याचबरोबर टीम परिवर्तनाच्या इतर उपक्रमात युवकांनी सामील होण्याचे आवाहान ही अविनाश पाटील यावेळी केले.