महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या हाती वेळेत पडणार शैक्षणिक साहित्य
By admin | Published: May 4, 2017 05:52 AM2017-05-04T05:52:38+5:302017-05-04T05:52:38+5:30
शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिका शाळांतील तब्बल
ठाणे : शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिका शाळांतील तब्बल ९५ टक्के विद्यार्थ्यांचे बँक अकाउंट ओपन केले असून उर्वरित ५ टक्के विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नसल्याने त्यांचे अद्याप खाते सुरू करण्यात आले नाही. परंतु, या विद्यार्थ्यांचेदेखील आधारकार्ड काढून अकाउंट उघडल्यावर त्यांच्याही हाती प्रथमच शाळा सुरू झाल्यावर शैक्षणिक साहित्य पडणार असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.
राज्य शासनाने ५ डिसेंबर २०१६ रोजी एक अध्यादेश काढला आहे. त्यानुसार, विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तुरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतरण रोख स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लाभार्थ्यांना प्रत्येक योजनेचा पूर्णपणे लाभ होऊन अनावश्यक गोष्टी टाळता येऊ शकतील, असा यामागचा उद्देश आहे. यासंदर्भातील एक कार्यपद्धतीदेखील निश्चित केली असून यामध्ये वस्तूबाबत वितरण योजना तयार करणे, ती विकत घेण्यासाठी अनुदान ठरवणे, वितरित करण्यात येणाऱ्या वस्तूंचे परिमाण ठरवणे, या योजनांतर्गत पात्रतेचे निकष, पात्रतेप्रमाणे लाभार्थ्यांची निवड, लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडणी करणे, निवड केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणाला मान्यता देऊन त्यांना लेखी कळवणे, लाभार्थ्यांनी परिमाणाप्रमाणे वस्तूंची खरेदी करणे आणि संबंधित यंत्रणेने लाभार्थ्याने खरेदी केलेल्या वस्तूची व सादर केलेल्या पावतीची शहानिशा करूनच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करणे आदी महत्त्वाच्या कार्यपद्धती निश्चित केल्या आहेत.
त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागानेदेखील या अध्यादेशाची अंमलबजावणी केली असून त्यानुसार आतापर्यंत ३२ हजार विद्यार्थ्यांपैकी ९५ टक्के विद्यार्थ्यांचे बँक अकाउंट ओपन करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यानुसार, आता विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये गणवेश असो अथवा टॅब, वॉटरबॅग, पुस्तके आदींसह इतर साहित्यांची रक्कमही जमा होणार आहे. शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा जास्तीची रक्कम जर विद्यार्थ्यांकडून दाखवली गेली, तर निश्चित केलेल्या वरची रक्कम त्याला मिळणार नाही, हे देखील शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
परंतु, उरलेल्या ५ टक्के विद्यार्थ्यांचे अकाउंट ओपन करण्यासाठी शिक्षण विभागाने शाळांना सुट्या लागण्यापूर्वीच त्यात्या शाळांच्या ठिकाणी आधारकार्ड कॅम्प लावून त्यांचे आधारकार्ड काढण्याची मोहीम पूर्ण केली आहे. त्यानुसार, त्यांचेदेखील अकाउंट ओपन करण्याची जबाबदारी त्यात्या विभागातील शिक्षकांकडे सोपवल्याची माहितीही शिक्षण विभागाने दिली. एकूणच शाळा सुरू होण्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या हाती आपसूकच वेळेत शैक्षणिक साहित्य पडेल, असा विश्वासही शिक्षण विभागाने व्यक्त केला. (प्रतिनिधी)
ठाणे महापालिका क्षेत्रातील स्थिती
महापालिका शाळांची संख्या १३१
विद्यार्थ्यांची संख्या ३२६३१
मराठी माध्यम शाळा-८९ - विद्यार्थी १९ हजार ३१०
हिंदी माध्यम शाळा-९ - विद्यार्थी २ हजार ८७१
उर्दू माध्यम शाळा - २३ - विद्यार्थी ८ हजार ६१०
गुजराती माध्यम शाळा -५ - विद्यार्थी २८५
इंग्रजी माध्यम शाळा -५ - विद्यार्थी १५६४