कल्याणमधील पत्रीपूलाच्या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांनाही; शाळेला लागतोय लेटमार्क
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 04:59 PM2019-08-22T16:59:53+5:302019-08-22T17:00:44+5:30
बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश पाटे यांचे शिक्षण मंत्र्यांना ट्विट, गोंधळाचा त्रास विद्यार्थ्यांना का?
डोंबिवली: पत्रीपूलावरून सत्ताधारी, प्रशासन यांच्यातआरोप प्रत्यारोप सुरु असतांनाच आता त्या ठिकाणी होणा-या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत असल्याने त्यांची शाळा अनाठायी बुडत आहे. शाळेत जायला उशिर झाल्याने शाळा प्रशासन देखील विद्यार्थ्यांना शाळेत घेत नसल्याने पालक हैराण झाले आहेत. डोंबिवली एमआयडीसी मधील रहिवासी बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश पाटे यांच्या पाल्यांना तसा अनुभव आल्याने त्रस्त पालकांनी थेट शिक्षणमंत्री आशिष शेलार यांना ट्विट लिहून गा-हाणे मांडले आहे.
गुरुवारी नेहमीप्रमाणे त्यांचा मुलगा कलयाणला शाळेत जायला सकाळी ७ वाजता घरातून निघाला, त्याला पत्रीपूलावर कोंडीला सामोरे जावे लागल्याने त्याला शाळेत जायला काहीसा उशिर झाला. शाळा सकाली ८ वाजून १० मिनिटांची असते, म्हणजे त्याला घरातून शाळेत जायला १ तासाहून अधिक वेळ लागला. त्यात त्या मुलांची चूक काय आहे? जर पत्रीपूलाचे काम वेळेत झाले, तेथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वीत झाली तर ही समस्या भेडसावणार नाही. त्यासाठी त्यांनी शेलार यांना ट्विट केले, तसेच पत्र लिहिल्याचे पाटे म्हणाले. विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी शाळा प्रशासनाचीही भेट घेत कोंडीच्या कारणाने काही लेट झाल तर मुलांना सूट द्यावी अशी विनंती केली, शाळा व्यवस्थापनानेही अडचण समजून घेतली, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. परंतु विद्यार्थ्यांनी अजून किती लवकर निघावे आणि शाळेत जावे? वाहतूक कोंडीत अडकल्याने मुलांच्या मानसीकतेवर परिणाम होतो, याचीही शिक्षणमंत्र्यांसह संबंधितांनी नोंद घ्यावी.
आमदार नरेंद्र पवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रीपूलाचे काम लष्कराकडे द्यावे अशी लेखी मागणी केली आहे, त्यामुळे तेथे समस्या भेडसावत आहेत हे वास्तव असल्याचे गांभिर्य ओळखून तातडीने उपाययोजना व्हाव्यात अशी अपेक्षा डॉ. पाटे यांनी व्यक्त केली. १० किमी अंतर कापण्यासाठी एवढा वेळ लागत आहे, हे योग्य नाही. एकीकडे वाहतूक कोंडी आणि दुसरीकडे शाळांचे काटेकोर नियम या कचाट्यात विद्यार्थी सापडले असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे चांगले नियोजन करून अरुंद पूलावरुन वाहतूक सुटसुटीत करण्यासाठी निदान आगामी काळात गांभीर्याने लक्ष घातल्यास विद्यार्थ्यांची शाळा अनाठायी बुडणार नाही. त्यामुळे पालकांना, पाल्यांना आणि शाळेलाही दिलासा मिळेल असेही ते म्हणाले.