कच्च्याबच्च्यांचे प्रभावी समुपदेशन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:48 AM2018-07-17T02:48:06+5:302018-07-17T02:48:08+5:30
ठाण्यातील अनेक मराठी शाळांची पटसंख्या वाढत असताना यात बाळकुम विद्यालयही कुठे मागे नाही.
- स्नेहा पावसकर
ठाणे : ठाण्यातील अनेक मराठी शाळांची पटसंख्या वाढत असताना यात बाळकुम विद्यालयही कुठे मागे नाही. विद्यार्थ्यांसाठी घेतले जाणारे जादा शिकवणीवर्ग, ई-लर्निंगसारख्या उपक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे होणारे समुपदेशन आणि त्यातून त्यांना दिले जाणारे मार्गदर्शन, ही बाब शाळेच्या गुणवत्तावाढीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते आहे.
बाळकुम येथील विद्या प्रसारक मंडळाचे बाळकुम विद्यालय याची स्थापना १९७७ साली ग.बा. म्हात्रे यांनी केली. शाळेत लहान शिशूपासून ते दहावी इयत्तेपर्यंतचे वर्ग भरतात. आजघडीला शाळेत सुमारे एक हजाराहून अधिक विद्यार्थी अध्ययन करतात. प्रत्येक इयत्तेच्या दोन तुकड्या असून एका तुकडीत सेमी इंग्रजी शिकवले जाते. पहिली इयत्तेपासूनच सेमी इंग्रजी आहे. विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान आणि इंग्रजी हे विषय इंग्रजीतून शिकवले जातात. यासाठी कोणत्याही पालकांवर दबाव आणला जात नाही. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा अंदाज घेत त्यांना सेमी इंग्रजीसाठी प्रवेश दिला जातो. सुरुवातीला सेमी इंग्रजी माध्यमात प्रवेश घेताना पालक चिंताग्रस्त दिसायचे. मात्र, आता बहुतांशी पालक आपल्या पाल्याला सेमी इंग्रजीत प्रवेशासाठी उत्सुक दिसतात. शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणीवर्ग घेतले जातात. विशेष म्हणजे अभ्यासात कच्चे असलेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकाचे शाळेतर्फे मोफत समुपदेशन केले जाते. त्यातून विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा, याचे मार्गदर्शन केले जाते. तसेच ध्यानधारणेच्या माध्यमातून एकाग्रता कशी वाढवावी, स्मरणशक्ती कशी वाढवावी, याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. पालकांचे समुपदेशन करून त्यांना विद्यार्थ्यांवर ताण न आणता कसा अभ्यास करवून घ्यायचा, याचे मार्गदर्शन केले जाते. याशिवाय, विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयारी व्हावी, म्हणून त्यांना स्कॉलरशिप, प्रज्ञाशोधसारख्या परीक्षेला बसवले जाते. अवांतर वाचनाची आवड लागावी, या उद्देशाने यावर्षीपासून विद्यार्थ्यांसाठी वाचनतासिका उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वर्गात अनेक विषय विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिकवले जातात.
>शाळेत विविध उपक्रम राबवण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर आम्हाला कायम प्रोत्साहन देतात. राबवल्या जाणाऱ्या अनेक उपक्रमांना पालक आणि विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. शाळेतील या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यालयाची गुणवत्ता आणि पटसंख्याही वाढते आहे. आमच्या
मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वी ठरले आहेत.
- एच.एस. पाटील, मुख्याध्यापक, माध्यमिक विभाग, बाळकुम विद्यालय