भिवंडीत भाजपाच्या कोंडीसाठी प्रयत्न सुरू

By admin | Published: April 20, 2017 04:01 AM2017-04-20T04:01:19+5:302017-04-20T04:01:19+5:30

भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीवर आपला, आपल्या कुटुंबीयांचा वरचष्मा रहावा यासाठी भाजपाच्या काही नेत्यांनी गेली दोन-अडीच वर्षे अभ्यास करून

The efforts of the BJP in the fierce battles continue | भिवंडीत भाजपाच्या कोंडीसाठी प्रयत्न सुरू

भिवंडीत भाजपाच्या कोंडीसाठी प्रयत्न सुरू

Next

भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीवर आपला, आपल्या कुटुंबीयांचा वरचष्मा रहावा यासाठी भाजपाच्या काही नेत्यांनी गेली दोन-अडीच वर्षे अभ्यास करून फिल्डिंग लावली असताना त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील नावे मतदारयादीत घुसवल्याचा आक्षेप घेतल्याने राजकीय शह-काटशहाला सुरूवात झाल्याचे मानले जाते. शिवसेना आणि धर्मनिरपेक्ष पक्षांना बाजूला ठेवत विजयाची मोट बांधण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचे प्रयत्न यातून सुरू झाल्याचे मानले जाते. मात्र प्रकरण न्यायालयात असल्याने यावर भाजपाचे नेते काहीही बोलण्यास तयार नाहीत.
भिवंडीच्या मतदारयाद्यांत २५ टक्के बोगस नावे घुसवल्याचा आणि ५० हजारांहून अधिक नावे दुसऱ्यांदा असल्याचा आरोप करणाऱ्या तीन याचिका सध्या उच्च न्यायालयात आहेत. त्यांच्यावर २१ एप्रिलला एकत्रित सुनावणी होणार आहे. त्या निकालाला अधीन राहूनच निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. या याचिकाकर्त्यांपैकी एक शिवसेनेचे आजी आणि एक भाजपाचे माजी नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या अर्जांना भाजपाच्या कोंडीचा राजकीय रंग असल्याची चर्चा सुरू झाली. पण ती त्यांनी फेटाळली. मतदारयादीत भाजपाच्या नेत्यांनी नावे घुसवल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. प्रभाग १८ च्या मतदारयादीला लावलेल्या पुरवणी यादीत अंजूरदिवा, हायवेदिवा, सुरई, भरोडी, कोन, पिंपळघर, आलिमघर, काल्हेर, कशेळी, पिंपळनेर, पिंपळास या ग्रामीण भागातील नागरिकांची नावे मतदार म्हणून घुसविलेली आहे. तसेच गोदाम पट्ट्यात वॉचमनचे काम करणाऱ्यांची नावेही यादीत असल्याचा दावा न्यायालयात केला आहे. पण त्यांच्या कुटुंबीयांची नावे मात्र नाहीत. अशी सुमारे तीन हजार बोगस नावे पुरवणी यादीत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.
प्रभाग १८ मधून महापौरपदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा नेत्यांचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप याचिकाकर्ता संजय काबूकर यांनी केला आहे. निवडणूक कार्यालयात सर्वसामान्य व्यक्ती यादीत नाव वाढविण्यास गेल्यावर त्याच्यांकडे विविध पुरावे मागितले जातात. परंतु पुरवणीयादीत नावे वाढविताना बऱ्याच अर्जदारांनी ते जोडलेले नसल्याने निवडणूक विभागातील संबधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी न्यायालयांत केल्याचे काबूकर म्हणाले.
प्रभाग १८ मधील अंजूरफाटा, ओसवालवाडी येथील स्थलांतरित मतदारांची नावे निवडणूक कार्यालयाने काढलेली नाहीत. त्याचबरोबर इतर प्रभागातील सुमारे १५०० बोगस नावे पुरवणीयादीत जोडली आहेत. भाजपा नगरसेवकांनी ही नावे वाढविल्याचा आरोप दुसरे याचिकाकर्ते सिध्देश्वर कामूर्ती यांनी केला असून ही नावे बाद झाल्याशिवाय मतदान घेणे अन्य उमेदवारांवर अन्यायकारक ठरणार असल्याने आम्ही उच्च न्यायालयांत याचिका दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The efforts of the BJP in the fierce battles continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.