नौपाडा पोलिसांच्या प्रयत्नांमुळे वृद्ध महिला स्वगृही परतली
By जितेंद्र कालेकर | Published: March 27, 2019 10:05 PM2019-03-27T22:05:20+5:302019-03-27T22:13:50+5:30
ठाण्याच्या सावरकरनगर येथून भरकटलेली ९० वर्षीय विजयमाला या वृद्ध महिलेला एका रिक्षा चालक महिलेने नौपाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी आणले. पुढे सोशल मिडियाच्या आधारे पोलिसांनी तिच्या कुटूंबियांशी तिची भेट घडवून आणल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
ठाणे : स्मृतीभ्रंश झाल्यामुळे सावरकरनगर येथून बेपत्ता झालेली ९० वर्षीय विजयमाला पुंडलिक नरिक ही वृद्ध महिला नौपाडा पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मंगळवारी सहा ते सात तासांनी स्वगृही परतली. एका रिक्षा चालक महिलेला ती मिळाल्यानंतर सोशल मीडियाच्या मदतीने पोलिसांनी पत्ता शोधून तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
ठाण्यातील पाचपाखाडी येथील साईबाबा मंदिराजवळ दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विजयमाला एका रिक्षाने आली. पण तिला कुठे जायचे, कुठून आली, हे काहीच सांगता येत नव्हते. अखेर महिला रिक्षा चालक पूनम यांनी तिला नौपाडा पोलीस ठाण्यात आणले. तिथेही स्वत:चे नाव विजयमाला याव्यतिरिक्त पत्ता साईबाबा मंदिराजवळ इतकीच त्रोटक माहिती तिने दिली. कुटुंबीयांची तिला काहीच माहिती सांगता येत नव्हती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले, हवालदार शब्बीर फरास तसेच इतर कर्मचाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षात तिची ही माहिती दिली. सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर करुन विविध ग्रुपमध्ये ती पाठविली. ठाणे शहरातील साईबाबा मंदिर आणि आसपासच्या ठिकाणी अनेक माध्यमांच्या मदतीने चौकशी केली. अखेर पाच ते सहा तासांच्या प्रयत्नानंतर सावरकरनगर येथील तिच्या कुटुंबीयांची माहिती उपनिरीक्षक कपिले यांना मिळाली. त्यांनी ओळख पटविल्यानंतर या महिलेचा ७० वर्षीय मुलगा दिलीप नारिक (रा. भोलेनाथ, बि. नं. २, पाटीलवाडी, सावरकरनगर, ठाणे) यांनी नौपाडा पोलिसांशी संपर्क साधला. तोपर्यंत नौपाडा पोलिसांनी तिच्या जेवणाची सोय वगैरे केली. तिचे नातेवाईक तिला पुन्हा मिळाल्यानंतर या वृद्धेने आणि तिच्या नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले.
.........................