ईद, दत्तजयंती, नाताळ उत्साहात

By admin | Published: December 25, 2015 02:05 AM2015-12-25T02:05:13+5:302015-12-25T02:05:13+5:30

मुस्लीम धर्मीयांचा ईद-ए-मिलाद, हिंदू धर्मीयांची दत्त जयंती व ख्रिश्चन धर्मीयांचा नाताळ हे सर्व सण लागोपाठ आल्याने पालघर जिल्ह्यात ते उत्साहात आणि सलोख्याने साजरे झाले.

Eid, Dattjayanti, Christmas excitement | ईद, दत्तजयंती, नाताळ उत्साहात

ईद, दत्तजयंती, नाताळ उत्साहात

Next

पारोळ : मुस्लीम धर्मीयांचा ईद-ए-मिलाद, हिंदू धर्मीयांची दत्त जयंती व ख्रिश्चन धर्मीयांचा नाताळ हे सर्व सण लागोपाठ आल्याने पालघर जिल्ह्यात ते उत्साहात आणि सलोख्याने साजरे झाले. मिरवणूका, धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना सभा, कार्निव्हल याची एकच धूम संपूर्ण जिल्ह्यात होती.
दिवाळीनंतर नाताळ हा वसईत मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण. तसेच पेल्हार, सोपारा, नवजीवन पापडी, विरार, वसई या भागांत मुस्लीम धर्मीय राहत असल्याने त्यांनी धार्मिक झेंडे व पताका बांधून राहती जागा सुशोभित केली. वसईत ख्रिश्चनांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने आपापल्या घरांत नाताळचा गोठा व आकर्षक रोषणाई केल्याने या परिसराला दुसऱ्या दिवाळीचे स्वरूप आले होते. दत्त जयंती याच दिवशी असल्याने ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, असा दत्तनामाचा जयघोष मंदिरांतून कानांवर पडत होता. ब्रह्मा, विष्णू, महेश असे रूप असलेल्या दत्तगुरूचे नामस्मरण करत अनेक ठिकाणी पूजेचे आयोजन केले होते. हे तिन्ही सण एकत्र आल्याने ते उत्साहाने साजरे होत असल्याने वसईत धार्मिक एकोप्याचेही दर्शन झाले.
वाडा : या तालुक्यात सुन्नी मुस्लीम बांधवांकडून आज मोहम्मद पैगंबर यांचा जन्म दिवस वाडाशहर, कुडूस, खानिवली, वडवली, नारे या मुस्लीम वस्ती असलेल्या गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मुस्लीम बांधवांसाठी शुभेच्छा, बॅनर्स, पताका, झेंडे, आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. वाडा शहरात खंडेश्वरी नाका ते मज्जीदनाका अशी रॅली काढण्यात आली होती.
कुडूस नाक्यावरून रॅली काढून ही रॅली संपूर्ण कुडूस गावात फिरविण्यात आली. नारा, वडवळी, गावांच्यावतीने वाडा - भिवंडी महामार्गावरून वडवली गावात रॅली नेण्यात आली.
या रॅलीत काँग्रेसचे नेते महमंद हुसेन, राष्ट्रवादीचे नुमान पटेल, रिद्वान पटेल, सफील मेमन, इकबाल मेमन, सतार मेमन आदीसह मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव रॅलीत सहभगी झाले होते. पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.
मनोर : हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त मुस्लीम बांधवांनी ईद मिलादुन्नबी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. टेणमध्ये सकाळी आठच्या सुमारास हातात झेंडे घेऊन नाते कलामचे प्रवचन करीत जुलूस (मिरवणूक) काढण्यात आली. जागोजागी शिरा, सरबत आणि खाण्याचे विविध प्रकारचे पदार्थ ठेवण्यात आले होते. या वेळी मनोर पोलीस ठाण्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवून वाहतूककोंडी होऊ नये म्हणून नाक्यानाक्यांवर व मिरवणुकीच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ईद मिलादुन्नबीनिमित्त जामा मशीद ते अशिया मशिदीपर्यंत आणि मनोर जामा मशीद ते मनोर बाजारपेठ पोलीस ठाणेमार्गे असे दोन भव्य जुलूस (मिरवणूक) मुस्लीम बांधवांनी काढले. त्यात लहान मुलांचाही समावेश होता. हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दिलेला संदेश शांतता ठेवणे, चांगले कर्म करणे, नमाज अदा करणे, कुराणचे वाचन करणे, अनाथ, विधवा, गोरगरिबांना मदत करणे, अशा अनेक गोष्टींची पुन्हा आठवण करून देण्यात आली.

Web Title: Eid, Dattjayanti, Christmas excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.