१७ डिसेंबरला रत्नाकर मतकरी स्मृती मालेत ईद - दीपावली - नाताळ संमेलन, सलोखा विषयावर विविध कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 02:51 PM2020-12-14T14:51:59+5:302020-12-14T14:52:30+5:30
Ratnakar Matkari Smriti Mala : येत्या गुरुवारी, १७ डिसेंबरला सायं. ६:३० वा. ठाण्यात समता विचार प्रसारक संस्था पुरस्कृत वंचितांचा रंगमंचाच्या वतीने, ईद - दीपावली - नाताळ स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
ठाणे - येत्या गुरुवारी, १७ डिसेंबरला सायं. ६:३० वा. ठाण्यात समता विचार प्रसारक संस्था पुरस्कृत वंचितांचा रंगमंचाच्या वतीने, ईद - दीपावली - नाताळ स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रत्नाकर मतकरी स्मृती मालेतील हा सहावा मासिक कार्यक्रम आहे, अशी माहिती कार्यक्रमाच्या संयोजक व संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी कळवली आहे.
भारतीय संविधानाने सर्व जाती धर्मियांना देशात समतेची वागणूक मिळेल, अशी हमी दिली आहे. तरीही देशात बुरसटलेल्या सनातनी प्रवृत्तींमार्फत भिन्न जाती – धर्मीयात तेढ निर्माण करण्याचे कारस्थान अनेकदा रचले जाते व त्यात सर्वसामान्य गोरगरीब जनता भरडली जाते. जन सामान्यांत सर्व धर्मीय समभाव बळकट व्हावा, यासाठी समता विचार प्रसारक संस्था गेली अनेक वर्षे ईद - दीपावली संमेलनाचा उपक्रम राबवीत आहे. यंदा या कार्यक्रमात सलोखा अर्थात सर्वांमध्ये मैत्री या थीमवर विविध लोकवस्तीं मधील एकलव्य कलाकार व कार्यकर्ते विविध कला कार्यक्रम सादर करणार आहेत. बाळकुम - माजीवडा येथील मुले सलोखा विषयावर तर कळवा - सावरकर नगरचे सर्व धर्म समभाव यावर नाटिका सादर करणार आहेत. मानपाडा व लोकमान्य नगरचे कलाकार मैत्रीवर अभिवाचन करणार आहेत तर कोपरीचे कलाकार गाणे सादर करणार आहेत. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी या वडील - लेकीतील मैत्रभावनेवर एक एकपात्री प्रयोग सादर होणार आहे. याशिवाय इस्लाम व ख्रिश्चन धर्मावर त्या त्या धर्माचे अभ्यासक मांडणी करणार आहेत. प्रसिद्ध रंगकर्मी मंगेश देसाई हे रत्नाकर मतकरी यांच्या भाऊ या धार्मिक सलोख्यावरील कथेच्या वाचनाने या रंगतदार कार्यक्रमाचा समारोप करणार आहेत.