पाच महिन्यांपासून साडेआठ हजार होमगार्ड मानधनाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 11:50 PM2021-03-01T23:50:18+5:302021-03-01T23:50:25+5:30
५० वर्षे वय झाल्याने कोरोनामुळे काम मिळेना : चिंतेचे वातावरण
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनामुळे गेली अनेक महिने लॉकडाऊन होते. त्यामुळे गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) अनेक जवानांना वयाच्या बंधनामुळे घरीच बसावे लागले. आता ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली तरीही ५०पेक्षा अधिक वयोगटांतील होमगार्डला बंदोबस्त मिळत नाही. शिवाय गेली पाच महिने त्यांना मानधन मिळाले नसल्याने काम आणि मानधनाअभावी आपले घर कसे चालवायचे याच, चिंतेत होमगार्डच्या महिला आणि पुरुष कर्मचारी आहेत.
ठाणे जिल्ह्यातील होमगार्डच्या जवानांचे गेली अनेक महिने मानधन थकीत आहे. यात काहींचे फेब्रुवारी २०२०पासून तर काहींची ऑक्टोबर २०२० पासून थकबाकी आहे. होमगार्डची सेवा नोकरी म्हणून न स्वीकारता समाजसेवा म्हणून तिचा स्वीकार केला जावा, असा दावा होमगार्डच्या वरिष्ठ कार्यालयातून केला जातो. परंतु, याच सेवेत गेली अनेक वर्षे काम केल्यानंतर अचानक अनेकांना घरी राहण्याचे आदेश दिले गेले. काहींना केवळ कोरोनामुळे ५० वर्षांपेक्षा जास्त वय झाल्यामुळे आरोग्याच्या कारणास्तव काम नाकारले आहे. परंतु, पोलीस आणि इतर खात्यातील कर्मचारी जर चांगल्याप्रकारे नोकरी करीत असतील तर मग केवळ होमगार्डच्या जवानांनीच काय केले आहे? मानधन थोडे उशिरा मिळाले तरी चालेल पण एकदम कामावरून काढू नका? अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
ठाणे जिल्ह्यात साडेआठ हजारांच्या घरात या जवानांची संख्या असून, यातील अनेकांना रेल्वे, वाहतूक तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांच्या बरोबरीने बंदोबस्त दिला जातो. कोरोना काळातही पोलिसांच्या बरोबरीने त्यांनी चांगल्याप्रकारे आपले कर्तव्य बजावले, मग तरीही हा विभाग दुर्लक्षित का? असा सवाल त्यांनी केला आहे.
महिन्याला किती मिळते काम?
अनेक होमगार्डच्या जवानांचे वर्षभरापासूनचे मानधन थकले आहे. दिवसाला ६७० रुपये त्यांना मानधन मिळते. सलग महिनाभर काम किंवा बंदोबस्त मिळाल्यास ते सुमारे २० हजारांच्या आसपास मानधन जाते. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून कामही आणि मानधनही नाही, अशी अवस्था या जवानांची आहे.
जिल्हा समादेशक
काय म्हणतात...
होमगार्डच्या जवानांचे मानधन काही कारणास्तव थकले आहे. परंतु, ते त्यांना लवकर मिळण्यासाठी आता प्रक्रिया सुरू आहे. मुख्यालयात त्यांची बिले मंजुरीसाठी पाठविली आहेत. त्यामुळे मानधनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. दुसरीकडे कोरोनामुळे वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या होमगार्ड कर्मचाऱ्यांना कामाचे वाटप केले जाऊ नये, असे शासनाचे आदेश आहेत. ५० वयोगटांतील होमगार्डलाही काम मिळण्यासाठी मुख्यालयात पाठपुरावा केला जाईल.
- स्मिता पाटील,
जिल्हा समादेशक, ठाणे