आरोग्य विभागाच्या परीक्षेत ठाणे जिल्ह्यात साडेआठ हजार विद्यार्थ्यांनी नशीब आजमावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 09:47 PM2021-10-31T21:47:47+5:302021-10-31T21:48:28+5:30
बहुचर्चित असलेल्या आरोग्य विभागातील 'ड' वर्गाच्या पदांसाठी रविवारी परीक्षा पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बहुचर्चित असलेल्या आरोग्य विभागातील 'ड' वर्गाच्या पदांसाठी रविवारी परीक्षा पार पडली. जिल्ह्यातील ४१ परीक्षा केंद्रांवर पार पाडलेल्या या परीक्षेत आठ हजार ८५१ विद्यार्थ्यांनी नशीब आजमावले आहे.
जिल्ह्याभरात ४१ परीक्षा केंद्रांवर या ड वर्गासाठी येथील जिल्हा रुग्णालय यंत्रणेने परीक्षा आज या परीक्षा घेतल्या आहेत. या केंद्रांवर १६ हजार ७०१ परीक्षार्थींची आसन व्यवस्था करण्यात आली होती. मात्र या परीक्षेला आठ हजार ८५१ विद्यार्थी उपस्थित होते. तर तब्बल सात हजार ८५० विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली. दुपारच्या सत्रात घेतलेल्या या परीक्षेला केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त होता. जिल्ह्यातील या ४१ केंद्रांवर अगदी सुरळीत परीक्षा पार पडल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डाँ. कैलाश पवार यांनी लोकमतला सांगितले.
या परीक्षेआधी गेल्या रविवारी ३५ केंद्रांवर 'क' वर्गाच्या पदांसाठी परीक्षा आधीच पार पडलेली आहे. यावेळी १७ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या या परीक्षेला १५ हजार २७८ विद्यार्थी उपस्थित होते. या परीक्षा सकाळ व दुपार या दोन सत्रात घेतल्या होत्या. मात्र आज ड पदांची ही परीक्षा केवळ दुपारच्या सत्रात सायंकाळी ४ वाजता संपली. आरोग्य विभागच्या तब्बल ३०० पेक्षा अधीक मनुष्यबळाचा वापर यासाठी करण्यात आला. पोलीसांच्या चोख बंदोबस्तात ही परीक्षा पार पडली.कोठेही कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नसल्याचा दावा डाँ.पवार यांनी केला आहे.